विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांसाठीही आता ऑनलाइन अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

राज्यभरातील सार्वजनिक विद्यापीठांतून आता विद्यार्थ्यांबरोबरच ज्ञानलालसा असणाऱ्या नागरिकांनाही ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.

पुणे-  राज्यभरातील सार्वजनिक विद्यापीठांतून आता विद्यार्थ्यांबरोबरच ज्ञानलालसा असणाऱ्या नागरिकांनाही ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी कला, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय, व्यवस्थापन, समाजशास्त्राचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. पुणे विद्यापीठात हे अभ्यासक्रम पाच ऑगस्टपासून सुरू होत आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्‍नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग’ योजनेअंतर्गत विविध शाखांचे ३५८ ऑनलाइन अभ्यासक्रम स्वयम संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि पूर्ण वेळ नोकरी करणारे; परंतु ज्ञानार्जनाची आस असणारे नागरिक हे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकतील. विशेष म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम मोफत आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) अभ्यासक्रम विकसित करून स्वयम संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. हे अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठ, संबंधित घटक पाहता येतील. विद्यार्थ्यांना दर आठवड्याला असाइनमेंट सबमिट करावी लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्वयममार्फत परीक्षा घेण्यात येईल. तसेच यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि श्रेयांक अर्थात क्रेडिट गुण देण्यात येतील. 

ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याचे क्रेडिट दिले जाणार आहेत. त्यामुळे पदवी वा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत असेल आणि त्याने हे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केले, तर त्याचे क्रेडिट अंतिम परीक्षेच्या मूल्यमापनात ग्राह्य धरले जाणार आहेत. पुण्याबरोबरच नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठावाडा विद्यापीठ, मुंबई आदी विद्यापीठांमध्येही हे अभ्यासक्रम आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी २० टक्‍के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल. तसेच ज्ञानलालसा असणारे नागरिकही हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील.
- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, ईएमआरसी, पुणे विद्यापीठ

असे आहेत अभ्यासक्रम
     सर्टिफिकेट कोर्स इन हिंदुस्थानी रागसंगीत
     कोर्स इन बिझनेस इकॉनॉमिक्‍स (मॅक्रो)
     कोर्स इन स्पेशल सर्व्हिसेस मार्केटिंग इन इंडिया
     फंडामेंटल ऑफ ऑफिस मॅनेजमेंट अँड मेथड्‌स
     पर्सनालिटी डेव्हलपमेंट
     रिटेल मॅनेजमेंट
     बिझनेस एथिक्‍स (मॅनेजिंग फॉर सस्टेनॅबिलिटी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online courses for citizens too