साडेसहा कोटींची ऑनलाइन फसवणूक

Online-fraud
Online-fraud

पुणे - पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या सोपान चौधरींच्या बॅंक खात्यातून १८ लाख १९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन काढून घेतले. तत्काळ गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय गृहिणीचे सव्वा लाख रुपये लंपास केले. आयुष्यभर कष्ट करून जमविलेले लाखो रुपये विमा पॉलिसी, गुंतवणुकीवर जादा परतावा, महागडे गिफ्ट अशी वेगवेगळी आमिषे दाखवून ज्येष्ठ नागरिक व महिलांना आर्थिक फसवणूक करणाऱ्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

घटना १ 
मुंबई पोलिस दलातून निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले सोपान चौधरी यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार होते. हृदयविकाराचा झटका आल्यावर ते वर्षभर रुग्णालयात उपचार घेत होते. मुलगा-सून परदेशात, मुलीचे लग्न झालेले. त्यामुळे आजारपणात पत्नी नंदा त्यांच्या सोबत होती. बरे झाल्यानंतर चौधरी यांनी एकदा बॅंक खाते तपासले. त्या वेळी बॅंक खात्यातील १८ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांना आढळले. त्यांना धक्काच बसला. त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरनेच चौधरी यांचे डेबिट कार्ड, बॅंक खाते क्रमांक मिळवून पैसे चोरल्याचे उघडकीस आले.

घटना २ 
कात्रजला राहणाऱ्या एका चाळीस वर्षीय गृहिणीस अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ‘तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज हवे आहे ना, आम्ही २० लाख रुपयांचे कर्ज तत्काळ देतो’, असे त्याने सांगितले. पुढे त्याचे फोन सतत येत गेले. वीस लाखांचे कर्ज तत्काळ मिळण्याच्या आशेने गृहिणीही आनंदी होती. पुन्हा फोन करून ‘कर्जाच्या प्रक्रियेसाठी ठराविक रक्कम भरा’ असे सांगण्यात आले. त्यानुसार गृहिणीने  सव्वा लाख रुपये सांगितलेल्या बॅंक खात्यात भरते. त्यानंतर मात्र समोरच्या व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अशा रीतीने फोनवरून गोड  बोलून गृहिणीचे तब्बल सव्वा लाख रुपये लंपास केले.

अज्ञात व्यक्ती मोबाईल, फोन किंवा ई-मेलद्वारे वृद्ध नागरिक, महिलांशी संपर्क साधतात. विमा पॉलिसी, महागडे बक्षीस, जादा परतावा किंवा स्वस्त गृहकर्ज अशी कारणे सांगितली जातात. वृद्ध किंवा महिलांशी गोड बोलून त्यांचे बॅंक खाते, डेबिट कार्डबाबतची सविस्तर माहिती घेऊन पैसे लंपास करतात. वृद्ध किंवा महिलांनी अनोळखी व्यक्तींचे फोन घेऊ नयेत. त्यांना वैयक्तिक माहिती देऊ नये. तसेच आपण कोणाशी बोलतो, या विषयी कुटुंबातील सदस्यांना माहिती द्यावी. 
- जयराम पायगुडे,  पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा 

फसवणुकीचे प्रकार 
बॅंकेतून अधिकारी बोलत असल्याचे भासविणे 
एटीएम कार्डची माहिती घेणे, क्‍लोन करणे 
विमा पॉलिसीबाबत माहिती सांगण्याचा बहाणा 
गृहकर्ज, बक्षीस, जादा परताव्याचे आमिष दाखविणे 
नोकरी, लग्नाच्या बहाण्याने फसवणूक

जाने. ते मे १८
एकूण तक्रारी   - १२००
विमाविषयक   - ३२
लॉटरी, गृहकर्ज  - ७४
इतर  - १०९४

जास्त दिवस झाल्यास  तपास करणे अवघड
अनोळखी व्यक्तींशी सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी वृद्ध नागरिक कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत नाहीत. पोलिसांकडेही तत्काळ तक्रार देत नाहीत. फसवणुकीला जास्त दिवस झाल्यानंतर पोलिसांना तपास करणे अवघड जाते. 

फसवणूक टाळण्यासाठी ही घ्या काळजी
बॅंक खात्याविषयीची माहिती कोणालाही न सांगणे 
बॅंकेविषयीच्या समस्या थेट बॅंकेत जाऊन सोडविणे 
बॅंकेकडून येणारा ‘ओटीपी’ इतरांना न सांगणे 
ऑनलाइन व्यवहारासाठीचे पासवर्ड सतत बदलणे
लॉटरी, बक्षीस लागल्याच्या भूलथापांना बळी न पडणे 
एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड बाहेरील व्यक्तींना न देणे
संशय आल्यास पोलिसांना तत्काळ कळविणे 

फसवणूक झालेल्यांची एकूण रक्कम 
६ कोटी ६२ लाख ८० हजार

आरोपसिद्धीनंतर प्राप्त झालेली रक्कम
३ कोटी ६७ लाख२५ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com