ऑनलाइन गेम... तुमच्या पैशावर नेम!

Online-Game
Online-Game

पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला. एकदा आईने सागरच्या मोबाईलवरून ऑनलाइन शॉपिंग केली, पुढे काही दिवसांतच त्यांच्या बॅंक खात्यातील १०-२० हजार रुपये अचानक कमी झाले. हा सर्व प्रकार घडला, तो सायबर गुन्हेगारांकडून सध्या ऑनलाइन गेम्ससाठी वापरल्या जाणाऱ्या चिटींग सॉफ्टवेअरद्वारे. यांसारखे असंख्य प्रकार शहरात घडत आहेत.

ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती काळजी घेतली, तरीही बॅंक खात्यातून ठराविक रक्कम अचानक कमी होण्याचा प्रकार अनेकांबाबत घडतो. त्यास वेगवेगळ्या प्रकारची कारणे असून, त्यामध्ये ऑनलाइन गेम खेळताना पुरेशी काळजी न घेण्याचेही एक महत्त्वाचे कारण पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या विश्‍लेषणातून (रुटकॉज ॲनॅलिसिस) पुढे आले आहे.  

या ऑनलाइन गेममध्ये स्वतःचे कौशल्य पणाला लावत निश्‍चित आव्हान पूर्ण केले जाते. मात्र अनेकदा ते आव्हान पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग म्हणजेच ‘चिटिंग सॉफ्टवेअर’चा वापर होतो. याच चिटींग सॉफ्टवेअरमधील अंतर्गत लिंक्‍सद्वारे सायबर गुन्हेगार, हॅकर्स रॅम्सनवेअरसारखे व्हायरस पसरवितात. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉपमधील आर्थिक व्यवहार, गोपनीय माहिती मिळविणे त्यांना शक्‍य होते. सायबर गुन्हेगार, हॅकर्स आर्थिक व्यवहार, गोपनीय माहितीवर बारकाईने लक्ष्य ठेवून रात्रीच्या वेळी संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम सहजरीत्या काढून घेतात.

बहुतांश प्रकरणे मुलांच्या किंवा स्वतःच्या चुकीमुळे होत असल्याने अनेकदा पोलिसांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होत नाही. सायबर गुन्हेगार गेम्सच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप हॅकिंग करून हा सर्व 
प्रकार करत असतात, याचा उलगडा लवकर होत नाही.

पबजी सर्वाधिक खेळला जाणारा गेम 
भारतामध्ये सध्या पबजी हा सर्वाधिक म्हणजेच ६१.९ टक्के इतक्‍या प्रमाणात खेळला जाणारा ऑनलाइन गेम आहे. याच गेमच्या आडून सायबर गुन्हेगारांकडून जास्त प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. त्यापाठोपाठ फ्री फायर (२१.७ टक्के), फोर्टनाईट (८.५ टक्के), रुल्स ऑफ सर्व्हायव्हल (६.२ टक्के) उर्वरित ऑनलाइन गेम्स (२५ टक्के) याही गेम्सच्याआडून ‘चिटींग सॉफ्टवेअर’द्वारे फसवणूक होते. कुटुंबांमधील लहान व तरुण मुले, कमावत्या व्यक्ती, वृद्धांसह आयटी, कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी, खासगी कार्यालयांपासून ते विविध क्षेत्रामध्ये थोडासा विरंगुळा म्हणून ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळण्याचे मोठे प्रमाण आहे. त्यातूनच अनेकदा फसवणुकीसारखे प्रकार घडत आहेत. 

अशी घ्यावी काळजी
  अधिकृत वेबसाइटवरूनच गेम डाऊनलोड करा. 
  मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉपची ‘सिक्‍युरिटी सेटिंग’ व्यवस्थित तपासा
  कोणत्याही गेमचे ‘चिटींग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करू नका
  गेम हॅकिंगच्या आमिषाला बळी पडू नका 
  ऑनलाइन गेमचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी कोणकोणती ‘परवानगी’ मागितली जातेय ते काळजीपूर्वक बघा 
  मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये सिक्‍युरिटी सॉफ्टवेअर (अँटी व्हायरस) जरूर वापरा.

ऑनलाइन मल्टिपल गेमिंगमधील चिटिंग गेम सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याच्या प्रकारामध्येच सर्वाधिक फसवणूक होत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि आयटी, कॉर्पोरेट, सरकारी, खासगी क्षेत्रापासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांकडून गेमचे चिटिंग सॉफ्टवेअर डाउनलोड केले जाते. त्याद्वारे सायबर गुन्हेगार रॅम्सनवेअरसारखा व्हायरसद्वारे मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप हॅक करून त्यातून आर्थिक लूट करतात.
 - योगेश ठाणगे, सायबर सुरक्षा सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com