esakal | ऑनलाइन पार्सल मागविणे महिलेला पडले चांगलेच महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

ऑनलाइन पार्सल मागविणे महिलेला पडले चांगलेच महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आई-वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हॉटेलमधून ऑनलाइन पार्सल मागविणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ४९ हजार ७६० रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Online Parcel Cheating Cyber Crime)

या बाबत एका ४६ वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या आई-वडिलांचा गेल्या महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने फिर्यादी यांनी त्यांच्यासाठी जेवणाचे पार्सल मागविण्याचे ठरविले. त्यांनी टिळक रस्त्यावरील एका हॉटेलची फेसबुकवर जाहिरात पाहिली. त्यातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून जेवणाचा डबा पार्सल मिळेल का, याबाबत विचारणा केली. संबंधित नंबर हा सायबर चोरट्यांचा होता.

हेही वाचा: पुणे : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची धिंड

त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठविली आणि दहा रुपये आगाऊ रक्कम पाठविल्यास पुढील ऑनलाइन व्यवहार पार पडेल, अशी बतावणी केली. त्यानंतर महिलेने तिच्या क्रेडिट कार्डची माहिती लिंकवर पाठविली. त्या माहितीचा वापर करीत महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रोकड काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबंधित मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन केले. मात्र तो नंबर बंद होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.

loading image