#OnlineWar यू-ट्यूबवर भारत विरुद्ध स्वीडन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - भारतीय संगीत कंपनी आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘दादा’ असलेला एक स्वीडिश युवक, यांच्यात यू-ट्यूबवर सुरू असलेले युद्ध जगभरातील नेटिझन्ससाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. ‘टी-सिरीजला अनसबस्क्राईब करा, अन्‌ प्युडीपायला सबस्क्राईब करा,’ असे आवाहन करणारी फ्लेक्‍सबाजी अगदी पुण्यासारखी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर चौकातही रंगली आहे.

टी -सिरीज अन्‌ प्युडीपायच्या सबस्क्राईबर्सची संख्या प्रत्येकी साडेसात कोटींच्या पुढे पोचली असून, सेकंदागणिक त्यात चढ-उतार होत आहेत.

पुणे - भारतीय संगीत कंपनी आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘दादा’ असलेला एक स्वीडिश युवक, यांच्यात यू-ट्यूबवर सुरू असलेले युद्ध जगभरातील नेटिझन्ससाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. ‘टी-सिरीजला अनसबस्क्राईब करा, अन्‌ प्युडीपायला सबस्क्राईब करा,’ असे आवाहन करणारी फ्लेक्‍सबाजी अगदी पुण्यासारखी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर चौकातही रंगली आहे.

टी -सिरीज अन्‌ प्युडीपायच्या सबस्क्राईबर्सची संख्या प्रत्येकी साडेसात कोटींच्या पुढे पोचली असून, सेकंदागणिक त्यात चढ-उतार होत आहेत.

संगीतकार गुलशनकुमार यांनी १९८३ मध्ये टी-सिरीज कंपनी स्थापन केली. या कंपनीने २००६ पासून यू-ट्यूबवर म्युझिक व्हिडिओज टाकण्यास सुरवात केली आणि सरत्या वर्षांपर्यंत सबस्क्राईबर्स साडेसात कोटींपेक्षा जास्त झाले आहेत. अन्‌ त्याचीच भीती स्वीडनच्या ‘प्युडीपाय’ला वाटत आहे. स्पर्धेत मागे पडू नये म्हणून प्युडीपायच्या समर्थनार्थ जगभरातील नेटिझन्सनी मोहीम सुरू केली असून, भारतीय नेटिझन्स मात्र निवांत आहेत. 

प्युडीपाय म्हणजे कोणती कंपनी नाही, तर तो अवघ्या २९ वर्षांचा युवक आहे. उमेदीच्या काळात हॉटडॉग विकणाऱ्या या युवकाने कॉलेजमधेच सोडून व्हिडिओ गेमला कॉमेंट्री करण्यास सुरवात केली. त्यात जम बसल्यावर इंटरनेटच्या कल्चरचे स्वरूप सांगणारे मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करून ते यू-ट्यूबवर अपलोड केले. त्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला अन्‌ त्याने सबस्क्राईबर्सचा साडेसात कोटींचा टप्पा गाठला. पण, टी-सिरीजने त्याला टक्कर दिली. त्यामुळे ‘प्युडीपाय’च्या प्रेमींनी, अनेक यूट्युबर्संनी त्याला सबस्क्राईब करण्याचे आवाहन वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे.

‘प्युडीपाय’ला सबस्क्राईब, तर टी-सिरीजला अनसबस्क्राईब करण्यासाठी एका फॅनने न्यूयॉर्कमध्ये ‘टाइम स्क्वेअर’वर ‘कीप प्युडीपाय नंबर वन ऑन यूट्युब’ या आशयाचा डिजिटल फ्लेक्‍स लावला आहे. एका हॅकरने यूएसमधील ५० हजार प्रिंटर हॅक करून ‘प्युडीपाय’ला सबस्क्राईब करण्याचे आवाहनात्मक मेसेज सर्वत्र पसरवले.

या दोघांच्या लढतीत कोणाची सरशी होणार?, याची सर्वांना उत्सुकता असून, यांच्यातील लढतीचा फायदा काही यूट्यूबर्संनी घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांच्या लाइव्ह सबस्क्राईबर्स काउंटचे स्ट्रिमिंग यू-ट्यूबर सुरू आहे. 

प्युडीपाय आणि टी-सिरीज यांच्यात चाललेल्या नंबर वनच्या लढतीत बाकीच्या यूट्यूबर्सचा फायदा होतोय. गेल्या सहा महिन्यांपासून चाललेल्या या लढतीमुळे अनेक स्ट्रीमर्सनी आपली पोळी भाजून घेतली आहे. त्याचबरोबर प्युडीपायने टी-सिरीजवर केलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे तो अधिक लोकप्रिय होत आहे.
- आशिष गोरडे, आयटीचा विद्यार्थी

कोण आहे नक्की प्युडीपाय?
प्युडीपाय म्हणजेच फेलिक्‍स अरविड उल्फ केजेलबर्ग (Felix arvid ulf kjelberg) हा स्वीडिश यू-ट्यूबर असून तो यू-ट्यूबवर लेटस प्ले कॉमेन्ट्री आणि रोस्टिंग व्हिडिओज टाकतो. कॉमेडी हा त्याचा गाभा आहे.

टी-सीरिज जर पहिल्या क्रमांकावर पोचले, तर भारतीय संगीताला एक नवी दिशा मिळेल. नव्या प्रतिभेला यू-ट्यूबच्या माध्यमातून जागतिक स्तरावर जाता येईल. 
- सुहृद केळजी, संगीत निर्माते

Web Title: Online War YouTube India Vs Swidan