अवघ्या 12 वर्षांचा चेतन देतोय मृत्युशी झुंज ! Chetan Gadhave | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Gadhave
अवघ्या 12 वर्षांचा चेतन देतोय मृत्युशी झुंज !

Video : अवघ्या 12 वर्षांचा चेतन देतोय मृत्युशी झुंज !

मुंढवा - शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या वाजता 12 वर्षांचा चेतन (Chetan Gadhave) रस्त्याने जात होता. चाळीस फुट उंचावरुन आलेली चार फुट लोखंडी सळई (Steel Rod) थेट चेतनच्या डोक्‍यात पडली. काही कळण्यापुर्वीच हा आघात झालेल्या चेतनने केवळ डोक्‍यात घुसलेल्या सळईला हात लावुन वर पाहीले आणि.... ऐकताना किंवा वाचतानाही अंगाचा थरकाप उडविणारी हि घटना मुंढवा परिसरात घडली. केबल व्यावसायिकाकडील कामगारांच्या निष्काळजीपणामुळे उंचावरुन पडलेली सळई डोक्‍यात घुसल्यामुळे गंभीर जखमी (Injured) झालेला चेतन सहा दिवसांपासुन शुद्धीवर आलेला नाही, रुग्णालयाच्या बेडवर पडलेला चेतन प्रत्येक क्षण अक्षरशः मृत्युशी झुंज देत आहे.

चेतन महेश गाढवे (वय 12, रा. साईपार्क, कल्याणी स्टील कंपनी समोर, मुंढवा) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी केबल व्यावसायिक राजेश भारती याच्याकडील दोन कामगारांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे काम करुन फिर्यादीच्या मुलास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चेतनचे वडील महेश गाढवे (वय 42) यांनी मुंढवा पोलिस ठाण्या फिर्याद दिली आहे. महेश गाढवे हे रास्ता पेठेतील ओम साई कलेक्‍शन नावाच्या दुकानामध्ये व्यवस्थापक आहेत. ते त्यांचा मुलगा चेतन, मुलगी, पत्नी व आई-वडीलांसमवेत साईपार्क परिसरात राहतात. शुक्रवारी (ता.28) दुपारी एक वाजता चेतनला कुटुंबीयांनी घराजवळच्या मेडीकलमधून गोळी घेऊन येण्यास सांगितले. तो मेडीकलमध्ये गेला, त्यावेळी मेडीकल बंद असल्याने तो घरी माघारी येत होता.

हेही वाचा: पुण्यात भीषण अपघात! हेल्मेट चक्काचूर, तरुणाचा जागीच मृत्यू

तेवढ्यात, तो राहात असलेल्या परीसरातीलच ललिता नामदेव क्षीरसागर यांच्या इमारतीवर केबल व्यावसायिक राजेश भारती याचे दोन कामगार काम करीत होते. त्यावेळी एका कामगाराकडून केबल वायर तुटल्याने वायरला लटकलेली लोखंडी सळई खाली पडली. त्याचवेळी खालुन पायी जाणाऱ्या चेतनच्या डोक्‍यात सळई पडली. या घटनेत चेतनच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर चेतनचे कुटुंबीय व स्थानिक नागरीकांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये हलविले. रुग्णालयामध्ये चेतनच्या डोक्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र अजुनही चेतन शुद्धीवर आला नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत गिरी करीत आहेत.

...अन्‌ धिरोदत्त चेतनने स्वतःच काढली डोक्‍यातील सळई

डोक्‍यात अचानक सळई घुसल्यानंतर चेतनने डोक्‍याला हात लावला. दोन-चार पावले चालत धिरोदत्त चेतनने स्वतःच्या हातानेच डोक्‍यातील सळई काढली. त्यानंतरही तो काही पावले पुढे चालत गेला. त्यानंतर तो बीडकर गोठ्याजवळ जाऊन कोसळला. त्यानंतर त्यास उचलून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. चेतन व त्याची 14 वर्षीय बहिण वैशाली हे दोघेही जण लष्कर परिसरातील दस्तुर शाळेत शिकतात. चेतन सहाव्या इयत्तेत, तर वैशाली नवव्या इयत्तेत शिकत आहे.

केबल व्यावसायिकांचा निष्काळजीपणा उठला मुलाच्या जीवावर

संबंधित परिसरामध्ये खाजगी केबल अनधिकृत जाळे आहे. नागरीकांच्या घरांवरुन सर्रासपणे केबल टाकल्या जातात. केबल टाकताना किंवा काढताना कोणत्याही प्रकारे नागरीकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. नागरीकांच्या जीवास धोका असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneaccident
loading image
go to top