esakal | राज्यात फक्त ६० टक्केच पालकांकडे आहेत 'ऑनलाइन एज्युकेशन'च्या सुविधा!
sakal

बोलून बातमी शोधा

E-Learning

स्मार्टफोन वापराच्या बाबतीत ग्रामीण भागात 56.8 टक्के पालक आणि शहरी भागात 70.7 टक्के पालक स्मार्टफोनचा वापर करत आहेत.

राज्यात फक्त ६० टक्केच पालकांकडे आहेत 'ऑनलाइन एज्युकेशन'च्या सुविधा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या विद्या परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या 60 टक्के पालकांकडेच इंटरनेटसह स्मार्टफोन असल्याचे समोर आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व युनिसेफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे. मुंबईसह 72 तालुक्यातील एकूण 760 शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी 737 शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यात ग्रामीण आणि शहरी भागातील तीन हजार 304 विद्यार्थी आणि तीन हजार 551 विद्यार्थिनींचा कल घेण्यात आला. यात 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फोन आणि वीजपुरवठा असल्याचे दिसून आले आहे.

HSC Result 2020: निकाल लागला, चांगले गुणही मिळाले; पण सेलिब्रेशन झालं 'मिस'!​

सुमारे 70 टक्के लोकांकडे टीव्ही आहे, तर 45 टक्के लोकांकडे रेडिओ आहे. तसेच डेस्कटॉप आणि लॅपटॉपची उपलब्धता असलेल्या लोकांची संख्या नगण्य आहे. स्मार्टफोन असणाऱ्या पालकांपैकी 59.8 टक्के कुटुंबांमध्ये स्मार्टफोन वापरता येतो. 
यात सामाजिक फरक स्पष्टपणे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. स्मार्टफोन वापराच्या बाबतीत ग्रामीण भागात 56.8 टक्के पालक आणि शहरी भागात 70.7 टक्के पालक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांमध्ये स्मार्टफोनचा वापर सर्वांत कमी म्हणजे 42.6 टक्के आहे.

इकडं जामीन मंजूर झाला, अन् तिकडं त्याला कोरोना झाला!​

स्मार्टफोन, इंटरनेट, रेडिओ, टीव्ही यांसारख्या सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची संख्या केवळ 17 टक्के आहे. नाशिक आणि नागपूर शिक्षण विभागात अधिक लोकांकडे सुविधा उपलब्ध नाहीत. सद्यस्थितीत डिजिटल सामग्रीद्वारे 50 टक्के मुले गृहअध्ययन संच वापरू शकतात. हे संच वापरणाऱ्या मुलांच्या टक्केवारीत पुणे विभाग सर्वाधिक (64.4 टक्के) आणि अमरावती विभाग सर्वांत कमी (31.4 टक्के) आहे.

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

सर्वेक्षणाच्या आधारे विद्या परिषद उपाय योजनांसाठी काही उपक्रम राबविणार आहे. गृहअध्ययन संचामधे टीव्ही आणि फोन कॉल/एसएमएस यासारखी विविध माध्यमे समाविष्ट केली जातील. डिजिटल सुविधा नसलेल्या वा अपुऱ्या सुविधा असलेल्या भागात शाळांचे कामकाज सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. आदिवासी मुले आणि विशेष गरजू असणाऱ्या मुलांपर्यंत स्वयंसेवक, मोबाईल टीचर यांच्यामार्फत शिक्षण पोहोचण्याची योजना विकसित करण्यात येणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वेक्षण 15 जून पूर्वी केले आहे. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता यावे म्हणून प्रयत्न सर्व पातळीवरून केले जात आहेत. लवकरच दुसरे सर्वेक्षण आम्ही हाती घेणार आहोत. यातून बदलाचे चित्र समोर येईल.

- दिनकर पाटील (संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद)

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top