खेडमध्ये शिवसेनेतील इच्छुकांमुळे राष्ट्रवादीला चमत्काराची संधी     

महेंद्र शिंदे
Saturday, 19 September 2020

खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीच्या सभागृहात ३० सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

कडूस (पुणे) : खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीच्या सभागृहात ३० सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. खेड पंचायत समितीत १४ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे प्राबल्य असले, तरी सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खेड पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. पंचवार्षिक निवडणुकीच्या पहिल्या अडीच वर्षात सुभद्रा शिंदे या सभापती होत्या. पंचवार्षिक दुसऱ्या सत्रातील अडीच वर्षांकरिता सभापतिपद नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव झाले. डिसेंबर महिन्यात शिवसेनेचे अंकुश राक्षे सभापती झाले होते. सदस्यांमध्ये आपआपसात ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा मंजूर झाल्यानंतर या रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही निवडणूक होणार आहे. पंचायत समितीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या विषयपत्रिका सर्व सदस्यांना पोच झाल्या आहेत. 

 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

खेड पंचायत समितीत १४ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे आहेत. सभापतिपदासाठी सुनीता सांडभोर व वैशाली जाधव या प्रबळ इच्छुक आहेत. मात्र, माजी उपसभापती भगवान पोखरकर यांना शब्द दिलेला आहे. त्याप्रमाणे त्यांना संधी मिळेल, असे मावळते सभापती राक्षे यांनी सांगितले. शिवसेनेचे प्राबल्य असले, तरी सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  त्यातच पंचायत समितीच्या नूतन वास्तू बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे सुध्दा महत्वाचे असल्याने निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for NCP due to Shiv Sena aspirants in Khed