अजित पवार विरुद्ध भाजपची पुण्यातील युवा ब्रिगेड संघर्ष रंगणार? 

मंगेश कोळपकर 
Thursday, 1 October 2020

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून शहर भारतीय जनता पक्षाने नव्या कार्यकारिणीमध्ये युवा ब्रिगेडला संधी दिल्याचे नियुक्‍त्यांमधून दिसून आले आहे.

पुणे ः आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून शहर भारतीय जनता पक्षाने नव्या कार्यकारिणीमध्ये युवा ब्रिगेडला संधी दिल्याचे नियुक्‍त्यांमधून दिसून आले आहे. सर्व प्रकारचा समतोल राखताना जाणीवपूर्वक युवकांवर लक्ष केंद्रीत करून पक्षाने आपली दिशा स्पष्ट केली आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरावरील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजप पेलणार, याकडे आता लक्ष असेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये महिलाध्यक्ष म्हणून अर्चना पाटील, युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी बापू उर्फ राघवेंद्र मानकर, युवती प्रमुख म्हणून निवेदिता एकबोटे, ओबीसी शहर प्रमुखपदी योगेश पिंगळे तर, अल्पसंख्यांक आघाडीच्या शहराध्यक्ष अली दारूवाला यांची नियुक्ती केली आहे. उपाध्यक्षपदीही रमेश आढाव, धनंजय जाधव, बाळासाहेब अमराळे आणि सुनील पांडे यांची निवड झाली आहे. तर चिटणीसपदी पक्ष संघटनेतील कार्यकर्ते विश्‍वास ननावरे, अरुण राजवाडे, पप्पू गरूड, शशिकांत कुलकर्णी, आनंद पाटील, उद्धव मराठे यांची नियुक्ती झाली आहे. या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठांचीही वर्णी लावण्यात आली असली तरी पक्षाचा तोंडावळा युवा असेल, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास 

महापालिकेत या पूर्वी 30 पेक्षा जास्त सदस्य संख्या नसलेल्या भाजपला मोदी लाटेमुळे 100 नगरसेवकांची लॉटरी लागली. महापालिकेत स्पष्ट आणि दणदणीत बहुमत मिळाले. तसेच आठपैकी सहा आमदरही पक्षाचेच आहेत. खासदार गिरीश बापट यांनाही लोकसभेत सुमारे सव्वा तीन लाखांच्या आसपास मताधिक्‍य मिळाले होते. पुणेकरांनी भाजपवर इतके भरभरून प्रेम केलेले असताना, पक्ष संघटना मधल्या काळात काहीशी थंडावल्याचे चित्र होते. भाजपची शक्ती असलेली यंत्रणा सक्रिय करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. तसेच पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे अभियानही नगरसेवकांना टार्गेट देऊन करण्यात येत आहे. सेवा सप्ताहापासून पक्ष संघटनेतील उपक्रमही जोमात सुरू आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपची युवा आघाडी या पूर्वी सक्रिय दिसत असे. परंतु, अन्य विभागांचे अस्तित्त्व फारसे जाणवत नव्हते. पक्षाच्या बैठका आणि संपर्क यंत्रणा कायम असली तरी, रस्त्यावर उतरण्याची वेळ या विभागांना फारशी आलीच नाही. कारण केंद्रात आणि महापालिकेत सत्ता आहे. परंतु, राज्य सरकारविरुद्ध रान उठविण्याची संधी असताना, कोरोनाने गाठल्यामुळे पक्ष संघटना खिंडीत सापडली. त्यातून बाहेर पडण्यासाठीच आता जाणीवपूर्वक युवा ब्रिगेड मैदानात उतरवून महापालिकेतील सत्ता राखण्याची व्यूहरचना भाजपने केली आहे.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही काही झाले तरी, महापालिकेतील सत्ता परत मिळवायची, असा पण केला आहे. त्यासाठी पक्षाचीही तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार त्यासाठी सक्रिय झाले आहेत. महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग असल्यामुळे मोदी लाटेत भाजप तरून गेला. परंतु, यावेळी दोन सदस्यांचा प्रभाग होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपला अधिक कष्ट घ्यावे लागणार आहे. युवा, महिला, युवती, अल्पसंख्यांक, ओबीसी आघाड्यांना आपले अस्तित्त्व शहर पातळीवर दाखवावे लागेल. तरच महापालिकेचा किल्ला राखता येईल. विद्यमान सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्याचेही आव्हान पार करण्यासाठी मुळीक यांना जिकिरीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या कार्यकारिणीच्या माध्यमातून ते यशस्वी होतील का, या बद्दल आता औत्सुक्‍य आहे.

(संपादन :सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opportunity for youth in bjp executive in pune