एल्गारप्रकरणी पवारांची सोयीची भूमिका - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

एल्गार परिषद प्रकरणात शहरी माओवाद्यांना अटक करण्याबाबत शरद पवार यांनी त्यांच्या सोयीची भूमिका घेऊ नये, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

पुणे- एल्गार परिषद प्रकरणात शहरी माओवाद्यांना अटक करण्याबाबत शरद पवार यांनी त्यांच्या सोयीची भूमिका घेऊ नये, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात फडणवीस बोलत होते. काही वर्षांपूर्वी शरद पवार मंत्री असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनीच माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर बंदी घातल्याची माहिती त्या वेळी लोकसभेत दिली होती. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सुधीर ढवळे यांना पहिल्यांदा अटक केली होती. अशांविरोधात पुरावे मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच एल्गार परिषद प्रकरणात शहरी माओवाद्यांना अटक केली. मग त्यांच्यावर कारवाई केल्याने आम्ही जातीयवादी कसे ठरतो? असा सवाल फडणवीस यांनी पवार यांना या वेळी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एल्गार प्रकरणात पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी पवार यांनी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, ""एल्गार परिषदेत कोणी कविता म्हटली, दलित होते, साहित्य मिळाले म्हणून कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणात त्यांच्या विरोधातील पुरावे बघून न्यायालयाच्या आदेशानंतर व जामीन फेटाळल्यानंतर सर्वांना अटक झाली आहे. तसेच त्यांचा एल्गार परिषद नाही, तर अनेक प्रकरणांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.'' 

सर्वोच्च न्यायालयात दोन विरुद्ध एक मताने असा निर्णय दिलेला असताना पवार मात्र नेमकी त्यांच्या सोयीने एका न्यायमूर्तींची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार यांचे सहकारी त्यांना चुकीची माहिती देत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

अमृता फडणवीस राजकारणात येणार नाहीत 
ट्विटरवर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यावर फडणवीस म्हणाले, ""अमृता फडणवीस माझ्या माहितीनुसार राजकारणात येणार नाहीत. पण त्या त्यांचे निर्णय स्वतः घेतात. त्या माझ्या अंडर काम करत नाहीत, त्यांना जे वाटते ते त्या करतात.'' त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात, अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader Devendra Fadnavis criticized Sharad Pawar Elgar Parishad case