esakal | सरकारविरोधात एल्गार पेटवा : दरेकर यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

shirur

सरकारविरोधात एल्गार पेटवा : दरेकर यांचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर : ‘‘राज्यातील रामोशी बांधवांसह बहुजन समाजाने महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार पेटवावा. भाजप या विद्रोहाच्या बळावर या नाकर्त्या लोकांची सत्ता उलथवून टाकेल. आमच्या हातात कमळ आहे, म्हणून आम्हाला कमजोर समजणारांनी हे ध्यानात घ्यावे की आमच्या दुसऱ्या हातात राजे उमाजी नाईक यांची कुऱ्हाड आहे. त्यातून अन्यायी राजवटीवर घाव घालणारच,’’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजिलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर बोलत होते. उमाजी नाईक यांचे सातवे वंशज रमण खोमणे यांचा यावेळी संघटनेच्या वतीने कुऱ्हाड व घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माळशिरसचे आमदार राम सातपुते, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, गणेश भेगडे, ॲड. धर्मेंद्र खांडरे, रामदास धनवटे, अंकुश जाधव, संजय जाधव, रोहिदास मदने, बाळनाना जाधव उपस्थित होते.

हेही वाचा: तालिबानला चर्चेत गुंतवून ठेवणे गरजेचे

दरेकर म्हणाले, ‘‘भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तयार केलेल्या घटनेनुसार, उपेक्षितांच्या कल्याणाचे भाजपचे धोरण आहे. या बहुजन घटकांच्या उत्कर्षालाच पक्षाचे प्राधान्य असते. पण, सद्यःस्थितीत राज्य सरकारकडून सामान्य समाजाची उपेक्षा चालू आहे. रामोशी समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजना गुंडाळल्या, समाजाच्या कल्याणकारी योजनांवरील निधी रोखला.’’ दौलत शितोळे यांनी स्वागत; तर प्रा. अविनाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत रेणके यांनी उमाजी नाईकांवर पोवाडा सादर केला. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आभार मानले.

आमदार पवार यांच्यावर टीका

या वेळी आमदार अशोक पवार यांच्यावर सर्वच वक्‍त्यांनी टीका केली. दौलत शितोळे यांनी त्यांच्यावर खुनशी राजकारणाचे आरोप केले. मला आडवे आलेल्यांना आडवे करण्याची धमक माझ्यात आहे, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घातकी राजकारण करून संघटनेत फूट पाडण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला.

समाजबांधवांवर अन्याय, अत्याचार झाल्यास राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचा राजकीय वध अटळ आहे, असे गणेश भेगडे म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास महाविकास आघाडीची शकले उडतील, असे योगेश टिळेकर म्हणाले. शिरूरचा पुढील आमदार भाजपचाच असेल, असा विश्‍वास दरेकर यांनी व्यक्त केला.

loading image
go to top