पालिका अर्थसंकल्पावरून विरोधक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मांडलेल्या अर्थसंकल्पावरील (२०१७-१८) चर्चेला मंगळवारी (ता. १६) सुरवात होणार आहे. मात्र, दुसरीकडे हा अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याचा आरोप करीत, या मुद्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी बाह्या सरसावल्या आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील चर्चेत अर्थसंकल्पातील योजना कशा फसव्या आहेत, हे तपशिलाने मांडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांना केले आहे. 

सत्ताधारी भाजपने गेल्या आठवड्यात सुमारे ५ हजार ९१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प  मांडला असून, महापालिकेच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होणार आहे. त्याचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन, अर्थसंकल्पातील योजना, तरतुदी याचा सविस्तर अभ्यास करून मुद्दे मांडण्याचे आवाहन केले. त्याकरिता नव्या नगरसेवकांनी कोणत्या विषयांवर बोलावे, याचे नियोजन करण्यात आले. अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही सभागृहात प्रभावीपणे मुद्यांची मांडणी करण्याचा सूचना केली आहे. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पात मोठी तूट दिसून येणार आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत, भाजपने केवळ दिखाऊपणा केला आहे. ते पुणेकरांसमोर आणले जाणार असून, त्यामुळे अर्थसंकल्प समजून, त्यावर अभ्यास करून बोलण्याबाबत प्रशिक्षण दिले आहे.’’ 

भाजप पटवून देणार अर्थसंकल्प
विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे दिसून लागताच, आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाबाबतचे आरोप परतवून लावण्यासाठी भाजपनेही नगरसेवकांची फौज उभारली आहे. अर्थसंकल्प कसा वास्तववादी आहे, हे पटवून देण्याकरिता भाजपने पक्षाच्या नगरसेवकांना धडे दिले. पक्षाच्या शहराध्यक्षांसह आजी-माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी या वेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबतचे विरोधकांचे आरोप तेवढ्याच आक्रमकपणे धुडकावून लावेल, असे पक्षनेत्यांनी सांगितले.

Web Title: opposition party leader aggressive on municipal budget