अग्निसुरक्षेवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून व नागरिकांना अग्निसुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास उत्तेजन देण्यासाठी सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.21) सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे 'आगीपासून झालेली हानी, ही राष्ट्रीय हानी, चला अग्निसुरक्षा उपायांचा स्विकार करूया' या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून व नागरिकांना अग्निसुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास उत्तेजन देण्यासाठी सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.21) सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे 'आगीपासून झालेली हानी, ही राष्ट्रीय हानी, चला अग्निसुरक्षा उपायांचा स्विकार करूया' या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील नावाजलेल्या 18 रांगोळी कलाकारांनी सहभाग नोंदवून सुंदर रंगांचा सृजनशील वापर करून अग्निसुरक्षा संदेशांना रांगोळीद्वारे जिवंत केले.  स्पर्धकांनी उत्कृष्ठ व परिणामकारकरित्या सदर केलेल्या विस्मयकारक रांगोळ्या अनुभवतांना दर्शक मंत्रमुग्ध झाले.  स्पर्धेचे परीक्षण एमआयटी महाविद्यालयाचे प्रा. अक्षय शहापूरकर, साहित्य कला अकादमीचे संचालक प्रीतम अथने यांनी केले. 

अग्निशामक विभागाचे डिव्हीजनल फायर ऑफीसर सुनील गिलबिले यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेत गणेश खरे प्रथम क्रमांक, सुलभ गाणगे द्वितीय तर महेंद्र मेतकरी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  विजेत्यांना स्मृतिचिन्ह व विजेते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. मल्हार अम्बुलगेकर व गौरव निविकार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी स्टेशन ड्युटी ऑफिसर ऋषिकांत चिपाडे, सेफ किड्स फाउंडेशन कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो यावेळी उपस्थित होते.

सुनील गिलबिले म्हणाले कि, "आगीमुळे प्रचंड प्राणहानी व वित्तहानी होते व आगीच्या आपत्तीमुळे करोडो रुपयांचे नुकसान होते.  अग्निसुरक्षेचा अवलंब करून आपण आपल्या जीवाचे व संपत्तीचे रक्षण करू शकतो. सेफ किड्स फाउंडेशन ही पुणे शहरातील एकमेव संस्था आहे जी अग्निसुरक्षेसाठी काम करत आहे व आम्हाला त्यांच्यासोबत काम करत असल्याचा आनंद आहे."

ऋषिकांत चिपाडे यांनी सेफ किड्स फाउंडेशन अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करून मुलांचे टाळता येणाऱ्या अपघातांपासून संरक्षण करण्यासाठी करत असलेल्या कार्याचा गौरव केला. डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, "बालकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये संगोपन होणे आवश्यक आहे असे सेफ किड्स फाउंडेशनचा प्रखर विश्वास आहे व आग व भाजण्यापासून होणाऱ्या जखमा ह्या पूर्ववत होऊ शकत नाहीत. म्हणूनच बालकांच्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी व पुणे व पिंपरी चिंचवड शहराला 'सेफ किड्स अॅट होम' आदर्श शहर बनवण्यासाठी सेफ किड्स फाउंडेशन अविरतपणे बालक व त्यांचे पालक यांच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे."

या दोन दिवसीय रांगोळी प्रदर्शनाला मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल, मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, वीर नेताजी पालकर हायस्कूल व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 1 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी भेट दिली. सेफ किड्स फाउंडेशन आणि हनीवेल हे महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या सहयोगाने प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाद्वारे शाळा व वस्त्यांमध्ये बालक व त्यांचे पालक यांच्यामध्ये आग व भाजणे प्रतीबंधाबाबत संवेदनशीलता निर्माण करत आहे. 

Web Title: Organizing fire-based rangoli competition