चिंचवडला साकारतेय ‘ऑक्‍सिजन पार्क’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पिंपरी - केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरामध्ये चिंचवड आणि पुनावळे येथे दोन उद्याने साकारण्यात येत आहेत. चिंचवड येथील लक्ष्मीनगर येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्‍सिजन पार्क’ आकार घेत आहे. या उद्यानामुळे प्रदूषणात घुसमटलेल्या शहरवासीयांना आरोग्यदायी वातावरण अनुभवता येणार आहे. 

पिंपरी - केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरामध्ये चिंचवड आणि पुनावळे येथे दोन उद्याने साकारण्यात येत आहेत. चिंचवड येथील लक्ष्मीनगर येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्‍सिजन पार्क’ आकार घेत आहे. या उद्यानामुळे प्रदूषणात घुसमटलेल्या शहरवासीयांना आरोग्यदायी वातावरण अनुभवता येणार आहे. 

दोन्ही उद्यानांसाठी एकूण दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुनावळे येथे सुमारे दोन ते अडीच एकर क्षेत्रावर उद्यान साकारण्यात येत आहे. चिंचवड येथील या प्रकल्पात कणेरी, तगर, सदाफुली, कोरांटी, आवळा, शंकासूर, पळस यासारखी देशी झाडे लावण्यात येणार आहेत. उद्यानाच्या सीमाभिंतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, खुली व्यायामशाळा अशा अन्य सुविधांसह कमीतकमी बांधकाम करण्यात येणार आहे. एकूण प्रकल्पाच्या ८० टक्के लॅण्डस्केप ते २० टक्के बांधकाम असेल. या वीस टक्‍क्‍यांमध्ये एन्ट्रन्स प्लाझा, पाणीपुरवठा, पाइपलाइनचा समावेश आहे. लिंक रस्त्यावरील संत गार्डन ते काळेवाडी पुलादरम्यान १५ मीटर रुंदीचा १.७ किलोमीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम सुरू असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्त्याव्यतिरिक्त तीन मीटर रुंदीचा जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकही करण्यात येणार आहे. रस्त्यालगत लिंब, वड, पिंपळ अशी देशी झाडे लावण्यात येणार असून, त्यासाठी पुण्यातील ‘फॉरेस्ट रिजनरेशन ॲण्ड एन्व्हायर्न्मेंटल सस्टेनेबिलिटी ट्रस्ट’ या संस्थेचे सहकार्य घेण्यात येत आहे. 

उद्यानाची वैशिष्ट्ये
क्षेत्र - सुमारे दोन एकर
झाडे - २,४८० 
जॉगिंग ट्रॅक -योगा आणि हास्य क्‍लबची सोय

आतापर्यंत दोनशे झाडांची लागवड झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या उद्यानामुळे नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचा आनंद मिळेल. 
- राजेंद्र गावडे, नगरसेवक

या दोन्ही उद्यानांचे काम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. 
- संजय कांबळे, कार्यकारी अभियंता

Web Title: oxygen park in chinchwad