पखवाज वादक पंडित गोविंद भिलारे यांचे कोरोनामुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक पंडित गोविंद भिलारे यांना (वय४६ ) कोरोनाची लागन झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुणे - अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक पंडित गोविंद भिलारे यांना (वय४६ ) कोरोनाची लागन झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे निधन झाले. गोविंद भिलारे हे नाना साहेब पानसे घराण्याचे प्रसिद्ध पखवाज वादक पं. वसंतराव घोरपडकर ,पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर व ह.भ.प महाराष्ट्र भुषण तुकाराम बुवा भुमकर यांचे ते पट्ट शिष्य होते.

भोर तालुक्यातील कीकवी येथे ८ जून १९७४ रोजी त्यांचा जन्म झाला होता. शेतकरी कुटुंबातील व अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन गोविंद भिलारे यांनी शास्त्रीय संगीता बरोबरच वारकरी संप्रदायाचा पखवाज जगभर पोहचवण्यात मोलाची कामगिरी केली. सिध्द हस्त कलाकार व उत्तम  शिष्य घडवणारे गुरु म्हणून त्यांची ओळख आहे.

हे वाचा - ससून रुग्णालयात 'इतके' ऑक्‍सिजन बेडस्‌ उपलब्ध होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

आवर्तन गुरुकुल , पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ येथे पखवाज विषयाचे ते मानद गुरु होते. पुणे महापालिकेच्यै शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सवाई गंधर्व महोत्सव, बदामी फेस्टिवल, ताज फेस्टिवल, हर वल्लभ संगीत सभा, तानसेन महोत्सव यासारख्या संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली होती. दूरदर्शन, आकाशवाणी वर संगीत कलेचे विविध यशस्वी सादरीकरण केले आहे. 

भिलारे यांनी त्यांचे  गुरू पं. वसंतराव घोरपडकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी सुरू केलेला शंकर- वसंत महोत्सव हा पखवाज महोत्सव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. "शिवोहम" ही त्यांची पखवाज,गायन व नृत्य यांची विशेष प्रस्तुती ही संगीताला मोठी देणगी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मृदंग रत्न पुरस्कार,संगीत रत्न पुरस्कार, संत संगीत भूषण पुरस्कार, वारकरी जीवन गौरव पुरस्कार,तालमनी पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. देश विदेशात त्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या कलेची परंपरा जोपासत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakhwaj player Pandit Govind Bhilare died at 46 due to corona infection