गोंदवल्यात खुनी हल्ला

गोंदवल्यात खुनी हल्ला
Published on

पळशीच्या तरुणावर गोंदवल्यात चाकूने वार
गोंदवले, ता. २८ : बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून पळशी (ता. माण) येथील हणमंत दौंड यांच्यावर चाकूने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गोंदवले बुद्रुक येथे घडली आहे. हल्लेखोरांनी जखमी तरुणाच्या खिशातील एक लाख रुपयेही लंपास केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत लक्ष्मण दौंड (वय ३२, रा. पळशी) हे गेल्या शुक्रवारी (ता. २४) दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून गोंदवले ते म्हसवड रस्त्याने जात होते. ख्वाजा गरीब नवाज मटन शॉपच्या विरुद्ध बाजूस असलेल्या एका बंद टपरीसमोर संशयित गणेश तात्याबा ढोले (रा. पळशी) याने त्यांना अडवले.
​सुरुवातीला किरकोळ बोलणे झाल्यानंतर गणेशने ‘तू माझ्या बहिणीला पळवून नेऊन लग्न का केले’? असा जाब विचारला. त्यानंतर त्याने अचानक पाठीमागे लपवून ठेवलेला चाकू काढून हणमंत यांच्या उजव्या बरगडीवर वार केला.
हल्ला सुरू असतानाच त्या ठिकाणी चार ते पाच अनोळखी लोक आले. त्यातील दोघांनी हणमंत यांना घट्ट पकडून ठेवले, तर इतरांनी त्यांच्या खांद्यावर आणि डोळ्याच्या खाली चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हणमंत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतरही संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी हणमंत यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनाही संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हणमंत जखमी होऊन पडलेले असताना गर्दी जमू लागल्याने संशयित पळून गेले. मात्र, पळून जाताना संशयितांनी हणमंत यांच्या खिशातील सुमारे एक लाख रुपये काढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. हणमंत दौंड यांच्या खबरीवरून संशयित गणेश ढोले व इतर पाच अनोळखी लोकांविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे अधिक तपास करत आहेत.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com