esakal | पालीतील बल्लाळेश्वर मंदिर उघडले; नियमांचे पालन करुन भक्तांना दर्श
sakal

बोलून बातमी शोधा

pali

पालीतील बल्लाळेश्वर मंदिर उघडले; नियमांचे पालन करुन भक्तांना दर्शन

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर गुरुवारी (ता.7) दर्शनासाठी खुले झाले आहे. नियम व अटींचे पालन करून भक्तांना दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश दिला जात आहे. मंदिर उघडल्याने भक्तांसह व्यावसायिक व पुजारी देखील आनंदी झाले आहेत.

हेही वाचा: रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड

गुरुवारी घटस्थापना असल्याने सकाळी मंदिरात भाविकांची तुरळक गर्दी होती. मात्र शुक्रवार (ता.8) पासून गर्दी वाढण्याची शक्यता आहे. देवस्थान मुख्य पुजारी गणेश कोणकर यांनी सांगितले की मंदिर उघडल्याने खूप समाधान वाटत आहे. भक्तांनी दर्शन घेतांना मास्क व सॅनिटायझर आदींचा वापर करून दर्शनाचा आंनद घ्यावा व इतरांना देखील द्यावा. तर बल्लाळेश्वर देवळातील गुरव, ओंकार खोडागळे यांनी सांगितले की मंदिर बंद असल्याने देवाची सेवा करता येत नव्हती. मात्र आता प्रत्यक्ष सेवा करता येत आहे. त्या बरोबरच भक्तांना देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येत नव्हते. मात्र त्यांना आता थेट गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार असल्याने भक्त उत्साही आहेत.

व्यवसाईक आनंदी

मंदिर बंद असल्याने येथील व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल व हातगाड्या देखील बंद झाल्या होत्या. मंदिर आज ना उद्या उघडेल या आशेवर बसलेले लोक उदरनिर्वाहासाठी धडपडत होते. मंदिर परिसरात हार, फुले, पेढे, खेळणी, सरबत, वडापाव, चहावाले, पापड, मिरगुंड, फळे, शोभिवंत वस्तू विकणारी असे 100 ते 125 दुकाने व हातगाड्या आहेत. तसेच छोटे-मोठे हॉटेल व लॉज व्यवसाईक व टपऱ्या आहेत. हजारो लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या यावर अवलंबून आहेत.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

मंदिर बंद असल्याने या सर्वांची परिस्थिती अत्यंत हालाखाची झाली होती. येथील रणजित खोडागळे या व्यावसायिकाने सकाळला सांगितले की या कालावधीत उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे घर चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र मंदिर खुले झाल्याने आता या परिस्थितीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे इतके महिने आर्थिक विवंचनेत असलेल्या येथील शेकडो छोट्या-मोठ्या व्यवसाईकांना खूप दिलासा मिळाला आहे. तसेच देवस्थान कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

"येथील रोजच्या रोज धंदा करणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली होती. तसेच रोजचे उत्पन्न घटल्याने साठविलेल्या पैशांवर अनेकांनी दिवस काढले. मात्र आता घडी पूर्वरत होईल."

-मनोज मोरे, व्यवसाईक, बल्लाळेश्वर मंदिर

"देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करणाऱ्यांनाच बाप्पाचं दर्शन दिले जाणार आहे. मंदिर बंद असतांना कठीण परिस्थितीत श्री बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाखांचा निधी दिला. कोविड सेंटरला साहित्य पुरविले, अन्नछत्र सुरू केले होते. रक्तदान शिबीरे राबविली. मंदिर खुले झाल्याने सर्वच आंनदी आहेत. आता कर्मचाऱ्यांचा पगार देणे व रोजचा खर्च भागविणे काही प्रमाणात सुलभ होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि चालना देखील मिळेल."

-ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट

loading image
go to top