
Palkhi Sohala : पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पुणे : जगद॒गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे शहरात सोमवारी (ता.१२) आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी आणि भाविक येतात. या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे सात हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र देहू येथून जगद॒गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (ता.१०) प्रस्थान ठेवणार आहे. तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता. ११) प्रस्थान ठेवणार आहे. या पालख्यांचे सोमवारी (ता. १२) शहरात आगमन होणार आहे.
शहरात दोन्ही पालख्या सोमवारी आणि मंगळवारी मुक्कामी राहणार असून, बुधवारी (ता. १४) पालखी सोहळा मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल.
तसेच, श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त असेल. तसेच, वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी, भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच, अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे सात हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त
गुन्हे शाखेची पथके तैनात
सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून पोलिस पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत. गुन्हे शाखेतील १५० पोलिस कर्मचाऱ्याचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास मनाई
शहरात पालखी सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. तक्षापि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करणाऱ्या संस्था आणि आयोजकांना त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक राहील, अशी माहिती गुन्हे शाखेचे (अतिरिक्त कार्यभार, विशेष शाखा) पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
पालखी सोहळा पोलिस बंदोबस्त
पोलिस उपायुक्त- १०
सहायक पोलिस आयुक्त- २
पोलिस निरीक्षक- ९७
सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक- ३२८
पोलिस कर्मचारी- तीन हजार ५४५
राज्य राखीव पोलिस दल आणि होमगार्ड