पालखी मुक्कामाच्या जागांचा कायमस्वरूपी विकास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; तिन्ही जिल्ह्यांसाठी धोरण निश्‍चित
पुणे - वारकऱ्यांना प्राथमिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मुक्कामाच्या जागा विकसित
करण्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार मुक्कामाच्या जागा भूसंपादन करून ताब्यात घेण्यात येणार असून, तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि ड्रेनेजची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; तिन्ही जिल्ह्यांसाठी धोरण निश्‍चित
पुणे - वारकऱ्यांना प्राथमिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मुक्कामाच्या जागा विकसित
करण्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार मुक्कामाच्या जागा भूसंपादन करून ताब्यात घेण्यात येणार असून, तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि ड्रेनेजची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे पालखी मुक्कामाच्या जागा ताब्यात घेऊन तेथे कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांची समिती नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. संत ज्ञानेश्‍वर माउली, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून पंढरपूर येथे जातात. या पालख्या तिन्ही जिल्ह्यांत मिळून 23 ठिकाणी मुक्काम करतात. काही ठिकाणी या जागा सरकारी असल्या, तरी अन्य ठिकाणी खासगी जागांवर पालख्यांचा मुक्काम होतो. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविताना प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यामुळे या जागा संपादित करून ताब्यात घ्याव्यात आणि विकसित कराव्यात, असे धोरण राज्य सरकारने तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीतील 15 हजार, संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील 10 हजार, तर संत सोपानकाकांच्या पालखीतील पाच हजार वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणीही झाली आहे. जागा कोणाची, मालकी कोणाची, जागा पुरेशी आहे का, भूसंपादनासाठी किती खर्च लागेल याबाबतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. जेजुरी येथील पालखी मुक्कामाची जागा संपादित करून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध आहे. भूसंपादन केल्यानंतर राहिलेल्या उर्वरित जागेवरील शेरे काढण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाहीही केली जाईल. सोहळा संपल्यानंतर लगेचच भूसंपादनाची कार्यवाही सुरू होणार आहे.‘‘

पालखी मुक्कामाच्या जागा या काही ठिकाणी सरकारी, काही ठिकाणी वनविभागाच्या, गायरान आणि खासगी मालकीच्या आहेत. यापैकी कोणतीही जागा ताब्यात घेण्यासाठी अडचण येणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पालखी गेल्यानंतर या जागांचा काय उपयोग करता येईल, याबाबतही कपोले यांच्या समितीकडून शिफारशी केल्या जाणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.

‘संत तुकाराम महाराज यांची पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी मेघडंबरीखाली ठेवण्यात येते. त्यानुसार तुकाराम महाराजांच्या संपूर्ण पालखी मार्गावर मेघडंबरी उभारण्यात येणार आहे.‘‘
- सौरभ राव (जिल्हाधिकारी)

Web Title: palkhi residence place development saurabh rav in pune