अठरा फुटांची बासरी घडवायचीय! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

अमूल्यज्योती पं. पन्नालाल घोष स्मृती समारोह आणि पं. केशव गिंडे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी (ता. 4) आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रम होत आहे. अमूल्यज्योती संस्थेच्या वाटचालीबद्दल प. गिंडे यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्‍न : बासरीवादनाची सुरवात कशी झाली? 
आमच्या कुटुंबाचे कुलदैवत कृष्ण असल्याने कला होतीच. मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे आईला वाटत होते. त्यातून तिने मला सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर "राष्ट्रगीत' वाजविले. तीच माझी सुरवात. त्यानंतर बासरी माझ्या शरीराचा अंग बनली आहे. 

प्रश्‍न : अमूल्यज्योती संस्थेची सुरवात कशी झाली? 
वालचंदनगरला असताना गुरू पं. हरिपंत चौधरी यांनी 1967 मध्ये बासरीच्या प्रचार, प्रसारासाठी, संशोधनासाठी काही तरी कर, असे सांगितले. मी त्या वेळी तेथील कलोपासक संस्थेचा सचिव होतो. गुरुंच्या आर्शीवादाने कामास सुरवात केली. मी मूळचा अभियंता असून, 1970 मध्ये पुण्यात आलो. त्याचदरम्यान पुणे आकाशवाणीवर माझी निवड झाली होती. दरम्यानच्या काळात अरविंद गजेंद्रगडकर आणि अन्य पाच-सहा मिळून आम्ही बासरीवादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. त्या काळात बासरीवादनाला स्वतंत्र व्यासपीठ नव्हते. उदयोन्मुख कलावंत, नवीन शिष्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. 

प्रश्‍न : बासरीचा प्रचार आणि प्रसाराच्या कार्याचा प्रवास कसा झाला? 
सर्व शिष्यांना संधी मिळावी, यासाठी काही राग एकत्र करून "वेणू वाद्यवृंदां'ची रचना केली. त्यातून "मल्हार-सागर', ऋतुरंगमध्ये सहा ऋतूंचे बारा राग, "कल्याण-नवरंग' (कल्याणचे नऊ प्रकार), "वेणू-नाट्यरंग', "वेणू-अभंगरंग', "वेणू-सारंग', "वेणू-लंकादहन-सारंग'असे वेगवेगळे राग निर्माण केले. चुलत बंधूपासून प्रेरणा घेऊन 1970 मध्ये घोष घराण्यानुसार खर्ज "सा' वाजणारी बासरी तयार केली. अर्थात ते मी माझ्या समाधानासाठी केले. मी बासरी टाळ्यांसाठी कधीच वाजवत नाही, ती आत्मिक समाधानाचे साधन आहे. 1984 मध्ये 11 छिद्रांची "केशववेणू' बनविली. बांबू आणि पीव्हीसी पाइपच्या जोडातून बासरी तयार करण्याचे संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या रागांप्रमाणेच "अतिखर्ज', "अनाहत वेणू', "चैतन्य वेणू' अशा बासऱ्यांची निर्मिती केली. पुढील पिढीपर्यंत हा वसा लिखित स्वरूपात गेला पाहिजे, त्यासाठी लिखाण सुरू आहे. 

प्रश्‍न : आयुष्यात आठवणीत राहील असा प्रसंग...? 
दिल्ली येथे 1991 मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांत पं. रघुनाथ प्रसन्न (पं. हरिप्रसाद चौरसियांच्या गुरुंचे गुरू) बसले होते. मला खूप दडपण आले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी ताण घेतली. माझे वादन झाल्यावर मी बाहेर पडलो. समोर पं. भीमसेनजी होते. त्यांना अभिवादन करून जात असताना पं. रघुनाथजींची हाक आली. ते माझी वाट पाहत होते. त्यांनी मी घेतलेल्या तानेबद्दल विशेष कौतुक केले आणि माझ्याकडून पुन्हा मेघमल्हार वाजवून घेतला. 

प्रश्‍न : आपल्या ऊर्जेचे रहस्य काय? 
प्रत्येकात ऊर्जा असतेच. सकारात्मक विचार केल्यास ती वाढते. अजून खूप काम करायचे असून अठरा फूट बासरी करण्याची माझी इच्छा आहे. व्यक्तीने स्वत:ला घडवायला पाहिजे. स्वत:चा शोध घेतल्यास खूप आनंद मिळतो.

Web Title: pandit keshav ginde