समांतर पुलाचे डांबरीकरण सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

हॅरिस पुलाला बांधलेल्या समांतर पुलाचे डांबरीकरण गुरुवारी सुरू झाले असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्यात येणार आहे. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या समांतर पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

हॅरिस पुलाला बांधलेल्या समांतर पुलाचे डांबरीकरण गुरुवारी सुरू झाले असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्यात येणार आहे. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या समांतर पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

हॅरिस पुलावर चार लेन असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतुकीची कोंडी होते. ते टाळण्यासाठी दोन्ही महापालिकांनी समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पूल बांधण्यात येत असून, त्याचा खर्च दोन्ही महापालिका एकत्रितरीत्या करण्याचे ठरले. पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी ४६ लाख रुपये खर्च येणार असून, २३ मे २०१६ रोजी या कामाला सुरवात करण्यात आली. 

सीएमईजवळ महापालिकेने भुयारी मार्ग बांधण्यास सुरवात केली आहे. तेथील काम जुलैअखेर संपणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना थेट हॅरिस पुलापर्यंत जाता येईल. या भागात दररोज गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. मात्र, बोपोडी व खडकीतील रस्ता अरुंद असल्यामुळे तेथील वाहतुकीची कोंडी कायम राहणार आहे. 

पुलाचे डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर पुलावर विद्युत दिव्यांसाठी खांब बसविण्यात येणार आहेत. पुलावर कडेला पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग केला आहे. त्यासाठी आकर्षक रेलिंग करण्यात येत आहे. पदपथाला पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम नंतर सुरू करण्यात येणार आहे. पुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतरही ते काम काही दिवस सुरू राहण्याची शक्‍यता आहे. 

एक जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे महापालिकेचे बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर असून, ते चार जून रोजी येणार आहेत. ते आल्यानंतर पुलाचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे.

नवीन पूल - 410 मीटर लांबी
10.5 - मीटर रुंदी
8 - खांब

Web Title: parallel bridge Sterilization