पालकांनी मुलांना वेळ द्यावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - स्पर्धेच्या युगात नोकरदार पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. परिणामी, एकाकीपणा दूर करण्यासाठी मुले मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यातच मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जाऊन मुले अविवेकी विचार करतात. शेवटी मृत्यूला कवटाळतात. म्हणूनच मुलांना पालकांनी समजून घेत वेळ देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.

धनकवडीत अथर्व मनीष भुतडा या १३ वर्षांच्या मुलाने अभ्यासासाठी पालक रागावले म्हणून थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर असंख्य नागरिकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर इतर कुटुंबांना असा फटका बसू नये, यासाठी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

मुलांसाठी हे करता येईल ! 
  मुलांशी अधिकाधिक संवाद साधणे
  मैदानी, साहसी व बौद्धिक खेळामध्ये मन गुंतविणे
  पर्यटन व निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणे
  चित्रपट, उद्याने पाहण्यासाठी घेऊन जाणे
  हसत-खेळत अभ्यास करण्यावर भर देणे
  वैविध्यपूर्ण चित्रांनी/गोष्टींनी भरलेली पुस्तके वाचण्यासाठी देणे. 

वाचकांच्या प्रतिक्रिया 
शहरीकरणामध्ये मैदाने संपुष्टात आली. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यावर मर्यादा येऊ लागल्या. उपलब्ध मैदानावर सशुल्क खेळ शिकविले जातात. मात्र काही पालक मुलांना घराबाहेरही पडू देत नाहीत. पालकांना मुलांना वेळ देता येत नसल्यामुळेही मुले मोबाईलकडे ओढली जातात. पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे.
- संदीप चौधरी

मुलांनी मोबाईलचा वापर नेमका का आणि कशासाठी करावा, हे त्यांना पटवून दिले पाहिजे. मुलांचे मन रमेल, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. मुलांच्या वैचारिक गरजांकडेही पालकांनी लक्ष द्यावे.
- सुमंत मेमाणे

पालकांनी घरामध्ये मोबाईलचा वापर टाळावा. तसेच मुलांनाही मोबाईलपासून दूर ठेवावे. 
- एच. पी. रामटेके

मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्यासमोर मोबाईलचा वापर करू नये. तसेच त्यांना खेळांची गोडी लावण्यास प्राधान्य द्यावे. 
- शेखर खोपडे

पालकांनी मोबाईलचा कामापुरताच वापर करून दूर ठेवावा. त्यामुळे मुले मोबाईलकडे आकर्षित होणार नाहीत.
- दिलीप चव्हाण

पालकांनी मुलांना लहानपणापासूनच आवर घातला पाहिजे. तरच भविष्यातील धोका टळू शकतील. 
- ए. बी. शेख

Web Title: Parent Child Time Mobile