पालकांनो, मुलांना वेळ द्या! | Parents | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parents
पालकांनो, मुलांना वेळ द्या!

पालकांनो, मुलांना वेळ द्या!

पुणे - पालकांनो, तुमच्या मुलांना सध्या सर्वाधिक गरज असेल तर ती तुमची. कोरोना, ऑनलाइन शाळा आणि इंटरनेट या ‘ट्रॅंगल’मध्ये अडलेल्या मुलांची एकाग्रता कमी झाली, लेखन-वाचन कौशल्य विकसित झालेले नाहीत, बाहेरच्या जगाशी संवाद कमी झालायं... या सगळ्यातून त्यांनी आत्मविश्वास गमावला. त्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आता मुलांना वेळ द्याच.

कोरोनाबद्दलची ‘अँझायटी’ मुलांमध्ये वाढली. हे फक्त मोठ्या मुलांमध्ये झाले असे नाही, तर लहान मुलांमध्येही दिसले, असे निरीक्षण ज्युपिटर हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी नोंदविले. या प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत असणे, त्यांना वेळ देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन शाळेची ‘कथा’

ऑनलाइन शाळेशी जुळवून घेताना मुलांना सुरवातीला त्रास झाला. कारण, त्यात शिक्षकांचे प्रत्येक मुलावर वर्गात बारकाईने लक्ष असते, तसे ऑनलाइनमध्ये ठेवता येत नाही. त्याचा गैरफायदा मुलांनी घेणे सुरू केले. वर्गात ‘लॉगइन’ करून व्हिडिओ गेम खेळणे, इंटरनेटवर व्हिडिओ बघत बसण्याची सवय लागली.

मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला

आई-वडील ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. त्यातून ते वेगवेगळे ‘चॅनेल सर्फ’ करतात. त्यात बडबड गितापासून कार्टून बघतात. त्यातून मुलांचा स्क्रीन टाइम वाढला.

कोरोनाचे मृत्यू जवळून पाहणाऱ्या मुलांची भीती वाढली. अजून लस मिळाली नाही. इतरांमध्ये मिसळणार आहोत, याचे एक दडपण होते. त्यामुळे सॅनिटायझरचा जास्त वापर, मुलांमध्ये न मिसळणे, शाळेत न जाणे हे प्रकार बघायला मिळले. मला आणि माझ्या आई-वडीलांना काही होईल का?, याची भीती, दडपण मुलांच्या मनावर कायम असते. यातून सारखे हात धुवायची, कपडे बदलण्याची सवय लागली.

- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ

हेही वाचा: उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

कौशल्य विकास खुंटला

संवाद कौशल्य : बाहेर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधणे. घरात आई-वडिलांशी बोलणे हे संवाद कौशल्य कमी झाले.

लेखन कौशल्य : गणितातील आकडेमोड, जोडाक्षर लिहिण्याच्या समस्या आता दिसत आहेत. अशी मुले आता शाळेत गेल्यानंतर ही मुले मागे पडणार आहेत. ऑनलाइन परीक्षा असल्याने लेखन कौशल्य कमी झाले. आता अचानक लिहिण्याचा वेग वाढू शकत नाही. अशा वेळी पालकांनी मुलांसोबत असले पाहिजे.

एकाग्रतेचा अभाव : इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल सतत डोळ्यापुढे असल्याने मनाची एकाग्रता करण्याचे कौशल्य कमी होत आहे.

काय परिणाम झाला?

  • हातातून मोबाईल काढला की मुलांची चिडचिड वाढू लागली.

  • लपून-छपून ‘व्हिडिओ’ बघणे किंवा ‘गेम’ खेळण्याची सवय लागली.

  • इंटरनेटचे व्यसन वाढले लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली.

  • शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालेली मुले मनानेही खच्ची झाली.

हे करा

  • पालक आणि शाळेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे

  • मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागणार

  • सातत्याने सराव करून घेणे

  • कोरोनाची भीती पालकांनी घालू नये

  • घरात अभ्यास करताहेत का बघणे

  • कोरोनाबरोबर राहण्याची सवय करावी

loading image
go to top