पालकांनो ‘सुसंवादी’ व्हा; शाळांमध्ये वाढताहेत ‘बुलिइंग’चे प्रकार

पुण्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित शाळेतील चार-पाच मुले एका दुबळ्या मुलासमवेत आक्षेपार्ह वर्तन करतात. त्याने पीडित मुलाच्या अंगावर जखमा होतात.
Children
Childrensakal

पुणे - पुण्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित शाळेतील चार-पाच मुले एका दुबळ्या मुलासमवेत आक्षेपार्ह वर्तन करतात. त्याने पीडित मुलाच्या अंगावर जखमा होतात. त्याचा मित्र आणि पीडित मुलगा स्वतःच्या आईला ही घटना सांगतात. ही धक्कादायक घटना ऐकून आई-वडील हादरून जातात.

ते तत्काळ शाळा गाठून संबंधित प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी लावून धरतात. मात्र काही दिवसांतच प्रकरणावर पडदा टाकला जातो. या प्रकारांबाबत शिक्षकांबरोबर पालकांनी वेळीच दक्ष होणे गरजेचे आहे.

या घटनेबाबत समाज माध्यमे आणि अन्यत्र चर्चा होऊन तो प्रकार समोर आला. परंतु पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधला असता, शाळांतील विद्यार्थ्यांकडून अन्य विद्यार्थ्यांवर ‘बुलिइंग’ म्हणजेच ‘गुंडगिरी’, ‘दादागिरी’चे प्रकार वाढत असून, त्यातून ‘टोळी राज्य’ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पुण्यातील आणखी एका प्रतिष्ठित शाळेत इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलाचे त्याच शाळेतील मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर २०२३ मध्ये समोर आला होता. परंतु, त्या घटनेवरही कालांतराने पडदा टाकण्यात आला. बरे अशा प्रकारांबाबत उघडपणे बोलण्यास कोणत्याही शाळांचे प्रतिनिधी (मुख्याध्यापक, शिक्षक) तयार होत नाहीत.

परंतु तरीही काही मुख्याध्यापकांशी संवाद साधण्याचा ‘सकाळ’ने प्रयत्न केला. शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये ‘बुलिइंग’चे प्रमाण वाढत आहे, परंतु त्याची नोंद कुठेही होत नाही, अशी खंत शिक्षक व्यक्त करत आहेत.

बुलिइंग म्हणजे काय?

(आपण शालेय विद्यार्थ्यांबाबत या शब्दाचा अर्थ पाहूयात)

  • एखाद्याला दरडावणे, धमकाविणे, चिडविणे, घाबरविणे

  • दादागिरी करणे, शिव्या देणे

  • व्यसन करायला भाग पाडणे

  • अश्लील शब्द वापरणे, अश्लील हावभाव करणे

मुलांवर होणारे परिणाम

  • मनात भीती बसते

  • घराबाहेर पडण्यास घाबरतात

  • भीतीपोटी शाळेत जाण्यास नकार

  • शिक्षणापासून दुरावण्याची चिंता

  • एकलकोंडी होणे

  • मानसिकतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून लहान वर्गातील मुलांवर होणाऱ्या दादागिरीच्या घटना सर्रासपणे घडत असल्याचे निरीक्षण आहे. यात दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या चार-पाच मुलांचा एक गट (टोळी स्वरूप) असतो. असे गट आपल्याच इयत्तेतील मुलांकडून पैसे मागतात, त्यांना धमकावतात. ते एकत्रितरीत्या घरातून शाळेसाठी निघतात आणि शाळेला दांडी मारतात. लहान वर्गांतील मुलांना आपल्याप्रमाणे व्यसन करण्यास बळजबरी केली जाते. पुण्यातील शाळांमध्ये अशा घटना सर्रासपणे सुरू असल्याचे निरीक्षण विविध शाळांतील मुख्याध्यापक नोंदवत असतात.

- मेधा सिन्नरकर, विद्या सहसचिव, पुणे शहर मुख्याध्यापक संघ (प्राचार्य, लक्ष्मणराव आपटे प्रशाला)

शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून दादागिरी, गुंडगिरीचे प्रकार होऊ नयेत, म्हणून दामिनी पथकांमार्फत समुपदेशन करण्यात येते. दामिनी पथकांची संख्या वाढविली असून, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘पोलिस काका’, ‘पोलिस दीदी’ यांच्यामार्फत संवाद साधण्यात येतो. परंतु गंभीर घटना असल्यास गुन्हा नोंदविला जातो. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शहरातील पाच लाख शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात यशस्वी झालो आहोत.

- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

‘बुलिइंग’ कायद्याच्या चौकटीतून

सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा म्हणून ‘बुलिइंग’ला कायद्याच्या चौकटीतून पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. ॲड. जान्हवी भोसले म्हणाल्या, ‘एखाद्या व्यक्तीने असे कृत्य केल्यास आणि पीडित व्यक्तीने आत्महत्या केल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला दहा वर्षांची शिक्षाही होऊ शकते. परंतु अशी मुले अल्पवयीन (१३ ते १६ किंवा १७-१८ वर्षांची) असतील तर काय शिक्षा? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘बुलिइंग हे लैंगिक शोषणाच्या स्वरूपाचे असेल, तर त्यावर ‘पोक्सो’ म्हणजे बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे बुलिइंग करणारी मुले स्वतःच अल्पवयीन असतील, तर यांना काय शिक्षा होईल? अल्पवयीन (वय वर्ष १२ ते १७ वयोगटातील मुले) मुलांनी गुन्हा केल्यास अल्पवयीन गुन्हेगारी कायद्याअंतर्गत शिक्षा केली जाते. परंतु बारा वर्षांखालील मुलांवर कोणतीही कारवाई करू शकत नाही. अल्पवयीन मुलांनी लैंगिक गुन्हा केल्यास त्यांना दोन वर्षांची शिक्षा केली जाऊ शकते.’

शाळांनी खबरदारी घ्यावी

  • शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे

  • गैरवर्तन, गैरप्रकार आढळल्यास त्वरित संबंधित विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे

  • संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना त्वरित सूचना द्यावी

  • विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधावा

  • विद्यार्थ्यांसमोर चांगले आदर्श ठेवावेत

पालकांची जबाबदारी काय?

  • मुलांची दफ्तरे, शाळेशी संबंधित साहित्याची तपासणी करा

  • पाल्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा

  • शिक्षकांकडून पाल्यांचे वर्तन, शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घ्या

  • मुलांच्या मनात असणारे गैरसमज दूर करा

  • मुलांशी मनमोकळा संवाद साधा

  • मुलांचा स्क्रिन टाइम (मोबाईल) कमी करा

१०९८ - चाइल्डलाइन हेल्पलाइन क्रमांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com