पालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का? मग ही बातमी वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळांनी काय तयारी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

पुणे : "शाळेत यायचे असेल, तर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करा', असे तुम्हाला (पालकांना) शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांगण्यात येत असेल, तर जरा थांबा आणि इकडे लक्ष द्या!! शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे कोठेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांकडून तुमची (पालकांची) दिशाभूल होत असेल, तर ते त्वरित शिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

नव्या कोरोना स्ट्रेनवर इतर लसीही ठरतील उपयुक्त; डॉ. गुप्ते यांची माहिती​

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, ही मान्यता देताना शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुणे शहरातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पुण्यात महापालिकेच्या शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा अशा जवळपास 214 शाळा सुरू झाल्या आहेत. काही खासगी शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे चिन्हे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, यात काही खासगी शाळा स्वत:च्याच काही सूचना तयार करून त्या पालकांवर लादत असल्याचे समोर येत आहे.

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे!​

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र आणणे आवश्‍यक केले आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालये या संमतीपत्राबरोबरच विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल देखील मागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र ""शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पालकांकडून विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मागविण्यात येऊ नयेत', असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले आहे. 

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विचारणार जाब : शिक्षण आयुक्त 
"शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळांनी काय तयारी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले असून त्याचा अहवाल शाळा व्यवस्थापनास सादर करण्यास सांगितले आहे.

यू आर सस्पेन्डेड; पुण्यात बिल्डरच्या खुन्यासोबतच हवालदारानं केली बैठक​

राज्य सरकारने दिलेल्या सुचनांमध्ये कोठेही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करावी, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने या मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून शाळा, महाविद्यालयांनी केवळ त्याच सूचनांचे पालन करावे. पालकांच्या संमतीपत्रासमवेत विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी अहवाल मागवीत येत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना जाब विचारण्यात येईल.'' 
- विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents were misled by schools and junior colleges about students corona test reports