यू आर सस्पेन्डेड; पुण्यात बिल्डरच्या खुन्यासोबतच हवालदारानं केली बैठक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

या प्रकरणामध्ये खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (वय 38, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तुल आणि काडतुसे पुरविल्याचे निष्पन्न झाले होते.

पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानोबार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करून खून करणाऱ्या आरोपीसमवेत बैठक केल्यामुळे चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराचे निलंबन करण्यात आले आहे. आरोपीबरोबर बैठक करणाऱ्या चंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवलदाराच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. 

परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत केलेल्या हवालदाराचे नाव आहे. बावधन ब्रुद्रक येथील जमिनीचा निकाल कानोबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने ते पाच ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेथून ते दुपारी पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्टेट बॅंकेच्या प्रवेशद्वाराजवळ आले, त्यावेळी ही घटना घडली होती. 

सुसाइड नोट लिहित तरुणीनं घेतला गळफास; आरोपीवर 'लव्ह जिहाद'चा आरोप​

या प्रकरणामध्ये खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (वय 38, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तुल आणि काडतुसे पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. साळुंके आणि त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (वय 36, रा. जनता वसाहत, पर्वती. मूळ रा. रत्नागिरी) हे दोघे त्यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार होते. त्यांच्यासह सनी अशोक वाघमारे (वय 26, रा. वाघोली), रोहित विजय यादव (वय 19, रा. सुखसागर नगर, कात्रज), गणेश ज्ञानेश्वर कुऱ्हे (वय 36), राहुल आनंदा कांबळे (वय 36), रुपेश आनंदा कांबळे (वय 38), हसमुख जसवंतभाई पटेल (वय 31) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

पुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर​

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी राजेश साळुंके, राकेश रमेश बुरटे, रोहित विजय यादव यांच्यासोबत पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस बसल्याचे सीसीटीव्हीच्या विश्‍लेषणावरून निष्पन्न झाले होते. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत साक्षीदारांकडून दुजोराही देण्यात आला.

सर्वजण घटनेनंतर 5 ऑक्‍टोबरच्या रात्री 9.30 वाजता गप्पा मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची शिस्त मलिन केल्याने तसेच पोलिस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने त्याच्याविरुद्ध परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police constable suspended for holding a meeting with accused