वाहनतळ ठेकेदारांकडून लूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे - महापालिकेने चारचाकी वाहनांसाठी प्रतितासाकरिता पाच रुपये शुल्क निश्‍चित केले असले तरी ठेकेदार वाहनचालकाकडून दहा रुपये वसूल करीत आहेत. वाहनचालकांची वारंवार होणारी ही लूट थांबविण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

पुणे - महापालिकेने चारचाकी वाहनांसाठी प्रतितासाकरिता पाच रुपये शुल्क निश्‍चित केले असले तरी ठेकेदार वाहनचालकाकडून दहा रुपये वसूल करीत आहेत. वाहनचालकांची वारंवार होणारी ही लूट थांबविण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

शहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या ठिकाणी, स्थानके असलेल्या भागात, उद्याने आदी ठिकाणी महापालिकेने नागरिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातील बहुतेक ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारती उभ्या केल्या आहेत. या सर्व जागा महापालिकेने ठेकेदारांना चालविण्यासाठी दिल्या आहेत. हे वाहनतळ चालविण्यासाठी देताना महापालिकेने वाहनांचा दर ठरवून दिलेला आहे. या दरानुसार दुचाकी वाहनांसाठी प्रतितास दोन रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी पाच रुपये इतके शुल्क निश्‍चित केले आहे. हे दर निश्‍चित केले असले तरी संबंधित वाहनतळांचे ठेकेदार दुप्पट पैसे वसूल करत आहेत. 

याबाबत शिरूर तालुक्‍यातील दीपक रत्नपारखी या नागरिकाने ‘सकाळ’कडे तक्रार केली. काही कामानिमित्त रत्नपारखी पुण्यात आले होते. मंडईत असलेल्या (आर्यन चित्रपटगृह) वाहनतळावर त्यांनी त्यांची चारचाकी पावणेबाराच्या सुमारास पार्क केली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ते चारचाकी वाहन घेण्यासाठी गेले असता, त्यांच्याकडे प्रतितास दहा रुपयांप्रमाणे पैसे मागण्यात आले. तेव्हा पाच रुपये इतका दर असताना जास्त पैसे वसूल कसे करता, असा प्रश्‍न त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारला. तेव्हा त्यांच्यात वाद झाले होते. 

अशा प्रकारे सर्वच वाहनतळांवर जास्त पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी येत असतात. काही वाहनचालक विनातक्रार पैसे देतात. 

बहुमजली वाहनतळाच्या ठिकाणी दर्शनी भागात भिंतीवर पार्किंग शुल्क दरांची माहिती द्यावी. पावतीवरही दर छापले पाहिजेत, जादा शुल्क आकारल्यानंतर तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांकही वाहनतळाच्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि पावतीवरही छापला पाहिजे. हे केले तर ठेकेदारांकडून होणारी लूट थांबविता येईल’’ 
 - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

तक्रार आल्यास संबंधितांना नोटीस
महापालिकेच्या भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागामार्फत या वाहनतळाच्या निविदा काढल्या जातात. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस काढली जाते, असे उत्तर प्रशासनाकडून दिले गेले. वाहनतळाच्या ठिकाणी दरानुसार आकारणी केली जाते की नाही, याची पाहणी केली जात असल्याचा दावाही प्रशासनाकडून  केला गेला. 

Web Title: parking loot from Contractors