लोहगाव विमानतळावर "पार्किंग लॉट' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. 

पुणे - लोहगाव विमानतळावर पार्किंगमधील गोंधळामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नजीकची सहा एकर खासगी जमिनीचे संपादन करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्या जागेवर "पार्किंग लॉट' निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. 

विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबरचे स्टॅंड आवाराच्या बाहेर उभारले आहेत. त्यामुळे त्यांना बॅगा घेऊन काही अंतर चालत जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ महिलांचे हाल होतात; तसेच पाऊस असताना बॅगाही भिजत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच विमानतळ प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना कॅब कंपन्यांकडून शुल्क आकारले जात आहे; तसेच तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबल्यास सुमारे 350 रुपये दंड केला जातो. या प्रकारामुळेही कॅबचालक विमानतळाच्या आवारात प्रवेश करण्यास तयार नसतात. त्यांनी प्रवेश केल्यास त्याचे शुल्क प्रवाशाच्या भाड्यातून वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विमानतळ संचालक अजयकुमार यांची भेट घेऊन, पार्किंगव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली. त्यावर अजयकुमार यांनी हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा (एएआय) आदेश असल्याचे सांगितले. या परिस्थितीत बदल करायचा असल्यास पार्किंगसाठी पुरेशा जागेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळापासून 100 मीटरवर खासगी सहा एकर जमीन आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर ती असल्यामुळे त्यावर बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने ही जागा संपादित करून पार्किंगला उपलब्ध करून द्यावी, असे अजयकुमार यांनी सुचविले. डॉ. धेंडे यांनी पुढाकार घेऊन त्याबाबत जागामालक, महापालिका आयुक्त, विमानतळ संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात जागेच्या बदल्यात रोख रक्कम किंवा टीडीआर उपलब्ध करून देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली; तर जागामालकांनी पार्किंग लॉट विकसित करून महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. या दोन्ही प्रस्तांवांवर येत्या आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली. याबाबत लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी भाड्याच्या शुल्कात विमानतळ विकसनाचे शुल्कही आकारले जाते; तसेच कॅब विमानतळाच्या आवारात आल्यास त्यांच्याकडूनही शुल्क आकारले जाते. या दोन्ही शुल्कांचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे किमान कॅबचे तरी शुल्क विमानतळ प्रशासनाने रद्द केले पाहिजे. 
सोनाली भोसले, प्रवासी 

लोहगाव विमानतळावरील पार्किंगव्यवस्था प्रवाशांना उपयुक्त नाही. त्यात तातडीने बदल केला पाहिजे. अवजड बॅगा घेऊन प्रवासी लांबवर चालत जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे. 
धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक विश्‍लेषक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking lot at Lohagaon Airport