#ParkingPolicy वाहनतळांवर दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे - नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावर चारचाकीसाठी तासाला दहा रुपये, तर तेथून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर पाच रुपये. हाच दर महात्मा फुले मंडईतील वाहनतळांवर आहे वीस रुपये. मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या या पार्किंग शुल्काबाबत कोणाला विचारणा करण्याचीही सोय नाही. कारण तसे केल्यास या वाहनतळांवरील ठेकेदारांचे गुंड कधी बाह्या सरसावतील याचा नेम नाही. वाहनतळांवरील ही दादागिरी थोपविणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम भापकर यांना बुधवारी आढाव वाहनतळावर तेथील गुंडांनी शिवीगाळ, मारहाण करून गाडी फोडण्याचा प्रकार केला. या प्रकारणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक करून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे शहरातील महापालिकेच्या वाहनतळांवर कशा पद्धतीने मनमानी आणि दादागिरी सुरू आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

काही अपवाद वगळता बहुतांश वाहनतळांवर ठेकेदाराने कामावर ठेवलेल्या व्यक्तींकडून अवाजवी पैसे आकारले जात आहेत. शहरात महात्मा फुले मंडई परिसरात हुतात्मा बाबू गेनू, सतीश धोंडीबा मिसाळ, नारायण पेठेत क्रीडामहर्षी हरिभाऊ साने, शिवाजीराव आढाव व पुणे स्टेशन येथे तुकाराम शिंदे ही महापालिकेची वाहनतळे आहेत. त्यामध्ये हाताने लिहिलेल्या पावत्या दिल्या जातात. काही ठिकाणी संगणकीकृत पावत्या आहेत. मात्र त्यावरूनही जादा पैसे आकारले जातात. अनेकदा वाहनचालक वाद नको म्हणून प्रकरण पुढे वाढवत नाहीत. त्यामुळे वाहनतळांवरील गुंडगिरीला बळ मिळत असल्याची सद्यःस्थिती आहे.

दरपत्रक, नियमावलीची बोंब 
बहुतांश वाहनतळांच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकींसाठी तासानुसार किती पैसे द्यावे लागतील, याबाबत कोणत्याही प्रकारचे दरपत्रक लावलेले नाही. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी दर खोडण्यात आले आहेत. तसेच  पार्किंगबाबतची महापालिकेची नियमावली, तक्रार करण्यासाठी संबंधित ठेकेदार, महापालिका अधिकारी, पोलिसांचे संपर्क क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे वाद झाल्यानंतर न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्‍न वाहनचालकांसमोर निर्माण होतो.

आढाव वाहनतळामध्ये पार्किंग शुल्कावरून पोलिस अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित ठेकेदाराबाबतची माहिती महापालिकेकडून मागविली आहे. या प्रकरणाचा तपास गांभीर्याने केला जाईल.
- सुनील कलगुटकर, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

महापालिकेचे दर
  चारचाकी - ५ रुपये (प्रतितास) 
  दुचाकी - २ रुपये (प्रतितास)

प्रत्यक्षात आकारली जाणारी रक्कम 
  चारचाकी - २० ते ३० रुपये (प्रतितास)
  दुचाकी - ३ ते १० रुपये (प्रतितास)

Web Title: Parking Policy Vehicle Parking Issue