दंतोपचार बनला लाइफस्टाइलचा भाग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे : दंतोपचार हा आता केवळ दुखण्यावरील उपचार राहिला नाही, तर सुंदर दिसण्यासाठीही डेंटिस्टकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मौखिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच व्यक्तिमत्त्व खुलविणे हेदेखील त्यामागे एक कारण आहे. त्यात युवतींपेक्षा युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे दंतवैद्यक क्षेत्रातून सांगण्यात आले. 

पुणे : दंतोपचार हा आता केवळ दुखण्यावरील उपचार राहिला नाही, तर सुंदर दिसण्यासाठीही डेंटिस्टकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मौखिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच व्यक्तिमत्त्व खुलविणे हेदेखील त्यामागे एक कारण आहे. त्यात युवतींपेक्षा युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे दंतवैद्यक क्षेत्रातून सांगण्यात आले. 

आपले दिसणं, रंग, हास्य, डोळे, नाक यावर आधीची पिढी बोलताना दिसून यायची, आज मात्र चेहरा व हनुवटीचा आकार, दात-दातांचे आकार, ओठ-ओठांचा आकार, रंग यावरही तरुण पिढी विचार करताना दिसून येत आहे. प्रेझेंटेशनच्या या युगामध्ये आपणही "प्रेझेंटेबल'च राहण्याकडे युवा वर्गाचा ओढा दिसून येतो. आपले दात एकसारखे नसतील अथवा हनुवटी जास्त पुढे असेल तर ऑर्थोडेंटिक ट्रीटमेंट घेता येते. त्यामध्ये तारा बसवून उपचार केले जातात. गरज वाटल्यास शस्त्रक्रियाही होते. तसेच लहानपणी खेळताना अथवा अपघातात दाताचा तुकडा पडला असेल, तर त्यासाठी कॉस्मेटिक सिलिंग्स करून कॅपचाही वापर होतो. त्यातही वैविध्य असून, अन्य दातांच्या रंगाला आणि आकाराला मिळतीजुळती कॅप तयार केली जाते. दातांमधील फटी हा तर चांगले दिसण्यातला मोठा अडथळा वाटू शकतो; म्हणून त्यासाठी "डायस्टेम क्‍लोझर'चा वापर करून कमी वेळत फट दूर केली जाते. यासाठी मोठा खर्च करण्याचीही तयारी युवक-युवतींची असते. 

"टुथ ज्वेलरी' लोकप्रिय 
चेहऱ्याचे क्‍लिनअप, ब्लीच, फेशिअल केले जाते, तसेच दातांचेही डेंटिस्टकडे जाऊन क्‍लिनिंग नियमितपणे करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. दातांसाठीही आता "टुथ ज्वेलरी' निर्माण झाली असून, ती लोकप्रिय होत आहे. युवकांमधील हा ट्रेंड पाहून पालकही आता नवनवे प्रयोग करण्यास सरसावले आहेत. त्यामुळे दुखण्यावर उपचारापेक्षा चांगलं दिसण्यासाठी डेंटिस्टकडे जाण्याचा कल वाढता आहे. 

तरुण पिढी ही आपल्या स्माईलबाबत जागरूक आहे, त्यांचे हास्य तसेच दाताचे सौंदर्य वाढविण्यासाठी ते डॉक्‍टरांचा सल्ला घेतात अन्‌ प्रसंगी 
मोठ्या खर्चाचे उपचारही करतात. त्यांना जे काही उपाय सांगितले जातात, त्याचे ते पालन करताना दिसतात. 
- डॉ. कांचन पाटील 

व्यक्तिमत्त्वात हास्य हा एक घटक महत्त्वाचा असला, तरी दिसण्यात "दात' हे महत्त्वाचे असतात. त्यामुळे दात स्वच्छ करणे, शेपमध्ये ठेवणे यासाठी डेंटिस्टकडे येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यात युवतींपेक्षा युवकांची संख्या जास्त आहे. 
- डॉ. गीतांजली ननावरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part of the lifestyle of dentistry became