हडपसरला प्रवाशांचा ‘रेल रोको’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंढवा - रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ बारामती-दौंड-कर्जत पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या संतप्त प्रवाशांनी गुरुवारी सकाळी मुंढवा येथील हडपसर रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणारी’ कोईमतूर एक्‍स्प्रेस’ रोखून अर्धा तास आंदोलन केले. 

बारामती-दौंड-पुणे-कर्जत पॅसेंजर गाडी बारामतीहून पुण्याकडे निघाल्यावर हडपसर रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे दीड तास बाजूला थांबवून, मागून येणाऱ्या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या गाडीने कामासाठी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना कामावर पोचण्यास उशीर होतो. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होते. याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली, मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.    

आज (ता. ८) सकाळी १०.२६ ला स्थानकावर येऊन थांबलेली गाडी ११ वाजले तरी पुढे सोडेनात. त्यामुळे पॅसेंजरमधील प्रवाशांनी खाली उतरून पुढे सोडली जाणारी कोईमतूर एक्‍स्प्रेस रोखून धरली. हे आंदोलन अर्धा तास सुरू होते. अखेर पोलिस आणि प्रशासनाने प्रवाशांची समजूत काढून सव्वाअकरा वाजता पॅसेंजर सोडली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानमहंमद पठाण व पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह, चार उपनिरीक्षक, १५ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पुणे रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक प्रफुल्ल क्षीरसागर, घोरपडी रेल्वेचे पोलिस निरीक्षक डी. के. पिल्ले, एस. डी. खिरवडकर, उपनिरीक्षक एच. वाय. पवार, सचिन कांबळे हेदेखील उपस्थित होते.

Web Title: passenger rail roko