पाकिस्तानला सडेतोड उत्तर - राजनाथसिंह 

Passing-out parade of the 137th course of the NDA
Passing-out parade of the 137th course of the NDA

पुणे - ‘‘देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आपले सैनिक सडेतोड उत्तर देतात. पाकिस्तान भारताला थेट आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणूनच तो नेहमी दहशतवादाचा आसरा घेत छुपे युद्ध छेडत असतो. त्याचे प्रत्युत्तर सैन्याने वेळोवेळी दिले आहे.२०१६ आणि २०१९ मधील सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून सीमापार जाऊन पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. पाकिस्तान छुपे युद्ध करत नेहमी तोंडघशी पडतो,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ शनिवारी राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी ते बोलत होते. एनडीएच्या २८५ विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपिन, रिअर ॲडमिरल एस. के. ग्रेवाल, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लेफ्टनंट जनरल सत्येंद्रकुमार सिंह, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्‍ला या वेळी उपस्थित होते. 

सिंह म्हणाले, ‘‘एनडीएच्या छात्रांनी आज उत्कृष्ट संचलन केले. तीन वर्षांच्या प्रशिक्षणात शिकलेल्या शिस्त आणि अनुशासनामुळे हे विद्यार्थी शांततेचा प्रसार करण्यासाठी व देशसेवेचा भार सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. देशाचे भविष्य योग्य आणि सुरक्षित हातांमध्ये आहे. त्यांची जिद्द, शिस्त आणि अनुशासन याचे हे प्रमाण  आहे.’’ 

‘‘प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांची ओळख देशाचा मान, सन्मान आणि स्वाभिमानाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या स्वरूपात झाली आहे. प्रशिक्षणादरम्यान मानसिक, शारीरिक आणि नैतिक बळ या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. तसेच त्यांच्या यशात आज मोलाचा वाटा त्यांच्या आईवडिलांचा आहे,’’ असेही सिंह म्हणाले. 

सैनिकांच्या कुटुंबांची जबाबदारी घेऊ 
सैनिकांनी आपल्या बलिदानाने देशाची सेवा केली आहे. आजची नवी पिढी नेहमी पैसे आणि प्रसिद्धीचा मार्ग निवडताना दिसते. परंतु याच नवीन पिढीतील हे छात्र देशसेवेला कतृत्व म्हणून लष्कराचा मार्ग निवडणारे देशाचे खरे भारतीय ठरले आहेत. या सैनिकांच्या कुटुंबांची सर्व जबाबदारी आम्ही घेऊ. तसेच सैनिकांना लागणाऱ्या मदतीसाठी संरक्षण विभाग नेहमी तत्पर असेल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com