Passport
PassportSakal

Passport : नऊ महिन्यांत एक लाखाहून अधिक वितरित ‘पासपोर्ट’ची घे भरारी!

परदेशात जाण्यासाठी इच्छुक पुणेकरांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी वाढत्या संख्येने गर्दी होत आहे.

पुणे - परदेशात जाण्यासाठी इच्छुक पुणेकरांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी वाढत्या संख्येने गर्दी होत आहे. कार्यालयीन नोंदीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नऊ महिन्यांतच तब्बल एक लाखाहून अधिक पासपोर्ट घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.

आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच पासपोर्ट असणे आवश्यक आहे, असे नागरिकांना आता वाटू लागले आहे. तसेच परदेश प्रवास पूर्वीच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर झाला आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. तसेच पासपोर्ट कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात सुलभता आली आहे. आता पासपोर्ट काढण्यासाठी तीन-चार दिवसांत अपॉइंटमेंट मिळते.

तसेच जून महिन्यापासून पासपोर्ट कार्यालय अनेकदा शनिवारही खुले असते. तसेच पासपोर्ट मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे आणि तो किमान १०-१५ दिवसांत मिळत असल्यामुळेही पासपोर्ट घेण्यास इच्छुक नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच गेल्या नऊ महिन्यांत पासपोर्ट कार्यालयाने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एक लाखांहून अधिक पासपोर्ट नागरिकांना दिले आहेत.

पोलिस पडताळणी वेळेत

पासपोर्ट प्रक्रियेतील पोलिस पडताळणी (पोलिस व्हेरिफिकेशन) ही बाब नागरिकांना या पूर्वी जिकिरीची वाटत. त्याबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. परंतु, या प्रक्रियेतही आता सुलभता आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पडताळणीतील काही टप्पे पूर्ण होतात. पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडूनही या बाबत पाठपुरावा केला जातो. त्यामुळे पोलिस ठाणे स्तरावरूनही पडताळणीची प्रक्रिया पाच-सात दिवसांत पूर्ण होते. त्यामुळे नागरिकांना पासपोर्ट लवकर मिळत आहे.

वितरित झालेले पासपोर्ट

  • २,३१, ३४६ - जानेवारी ते डिसेंबर २०२१

  • ३,४४,४४७ - जानेवारी ते डिसेंबर २०२२

  • २,८०,१२० - जानेवारी ते ऑक्टोबर २०२२

  • ३,८८,४३७ -जानेवारी ते ऑक्टोबर २०२३

नऊ वर्षांनी पोलिस पडताळणी

बारामतीमधील एका नागरिकाने फेब्रुवारी २०१४ मध्ये पासपोर्ट काढला होता. परंतु त्या वेळी त्याची पोलिस पडताळणी (व्हेरिफिकेशन) झाली नव्हती. पासपोर्ट कार्यालयाने त्या बाबत नुकतीच त्यांना नोटीस पाठवून पडताळणी पूर्ण करून घेण्यास सांगितले. या बाबत डॉ. देवरे म्हणाले, ‘‘क्वचित काही प्रकरणांत पडताळणी न होता पासपोर्ट दिला गेला असल्यास ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह केला जातो.

संबंधित पासपोर्टधारकाने पोलिस पडताळणी केली नसल्यास परदेश प्रवासादरम्यान त्याची अडचण होऊ शकते. तसेच पासपोर्ट कायद्यान्वये पोलिस पडताळणी न झाल्यास संबंधित पासपोर्ट रद्द होऊ शकतो. त्यामुळे याबाबत आग्रह धरला जात आहे.’’

पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस सुलभ होत आहे. तत्काळची अपॉइंटमेंट एक दिवसात, तर नियमित प्रक्रियेतील पासपोर्टची अपॉइंटमेंट आता तीन दिवसांत मिळते. पासपोर्ट देण्यासाठीच्या रोजची अपॉइंटमेंट संख्याही वाढविण्यात आली आहे. तसेच ‘एक्स’ या सोशल मीडियावरून नियमितपणे नागरिकांसाठी पूरक सूचना दिल्या जातात. त्यामुळे पासपोर्ट घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

- डॉ. अर्जुन देवरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com