पोलिस पडताळणीच्या कालावधीमुळे पासपोर्ट मिळण्यास होतो विलंब | passport | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passport
पोलिस पडताळणीच्या कालावधीमुळे पासपोर्ट मिळण्यास होतो विलंब

पोलिस पडताळणीच्या कालावधीमुळे पासपोर्ट मिळण्यास होतो विलंब

बारामती - पासपोर्टच्या पोलिस पडताळणीच्या कालावधीमुळे लोकांना पासपोर्ट हातात मिळण्यास विलंब लागत आहे. पोलिस पडताळणी हा पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रीयेतील क्लिष्ट भाग असल्याने अनेकांना हेलपाटे मारण्यासह मनस्तापालाही सामोरे जावे लागते.

पुणे जिल्ह्यात पुणे शहर सोडल्यास फक्त बारामतीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्टचे अर्ज स्विकारले जातात. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु झाले, त्याचा फायदा अनेकांना होतो. मात्र पासपोर्ट नव्याने काढण्यासह नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष पासपोर्ट हातात पडेपर्यंतचा कालावधी अर्जदारांसाठी मनस्ताप देणारा असतो.

अर्ज केल्यानंतर पोलिस पडताळणीसाठी संबंधित पोलिस ठाण्यात अर्जदाराला जावे लागते. इथेही संबंधित पोलिस व अधिका-यांच्या सवडीनुसार वेळ काढून कागदपत्रांची जमवाजमव करुन जावे लागते. एका भेटीत काम होईल याची कोठेच शाश्वती नसते. दुसरीकडे प्रत्येक पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी त्याला आवश्यक ती कागदपत्रे मागून अर्जदारांना हैराण करतात. कागदपत्रे पुरेशी नसल्याने अर्जदारांना हेलपाटा मारावा लागतो.

या दिव्यातून बाहेर आल्यानंतर पोलिस पडताळणीचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयास व तेथून पासपोर्ट कार्यालयास पाठविला जातो. पोलिस अहवालानंतर पासपोर्ट कार्यालय पासपोर्ट मंजूर करते, त्या नंतर पासपोर्टचे प्रिटींग, लॅमिनेशन होऊन स्पीड पोस्टाने तो अर्जदाराच्या घरी येतो.

हेही वाचा: समाजाचा विरोध असताना दुर्गम भागातील तरुणी झाली पहिली पदवीधर

या प्रक्रीयेमध्ये पोलिस पडताळणी आल्यापासून ते पासपोर्ट हातात पडेपर्यंत आपल्या पोलिस पडताळणीची प्रक्रीया कोठपर्यंत पुढे सरकली आहे, याची माहिती अर्जदाराला मिळत नाही. पोलिसांकडे चौकशी केल्यास अहवाल पाठवल्याचे सांगितले जाते, पोलिस अधीक्षक कार्यालयात कोणाकडे चौकशी करायची हे अर्जदाराला माहिती नसते, इथूनही अहवाल पासपोर्ट कार्यालयात गेला तर तेथे कोणाला विचारायचे हे अर्जदाराला माहिती नसते.

संकेतस्थळावर पासपोर्टची स्थिती बदलण्यास बराच कालावधी लागतो, ज्यांना तातडीने पासपोर्ट हवे असतात त्यांनाही अनेकदा वेळेत पासपोर्ट मिळतच नाहीत, असा अनुभव आहे.

अर्जदाराला ऑनलाईन माहिती मिळणे गरजेचे

आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याची माहिती पोलिस विभागाकडून अर्जदाराला ऑनलाईन मिळणे गरजेचे आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात किती तारखेला अर्ज आला, तो किती तारखेला अधीक्षक कार्यालयात गेला, तिथून तो पासपोर्ट कार्यालयात किती तारखेला गेला याची माहिती देण्याची गरज आहे.

एका भेटीत काम व्हायला हवे

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात आवश्यकच कागदपत्रांची मागणी होईल व एका भेटीतच काम होईल याची काळजी घेण्याची गरज आहे.

- अजय जाधव, बारामती.

loading image
go to top