विकासाला दिशा देण्यासाठी ‘पथदर्शिका’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

कोणत्याही राज्याचा विकास हा पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देणारा असतो. त्याला दिशा देण्याच्या दृष्टीने चांगले धोरण देण्याचा प्रयत्न आम्ही या धोरणपत्रिकेतून केला आहे. यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सामावून घेण्यात आले आहे. 
- डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका (२०१९-२०२४) तयार केली आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता वाढावी, शहरांच्या विकासाची शाश्‍वत धोरणांसाठी माहिती विश्‍लेषणाची व्यवस्था आणि शेतजमिनीच्या जुनाट कायद्यांत बदल आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिफारशी केलेल्या आहेत.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर प्रशांत जगताप, नीलेश निकम, विनिता तटके यांच्याबरोबरच या धोरणपत्रिकेचे लेखक अनिल सुपनेकर, अमिताव मलिक, डी. बी. मोडक, चंद्रहास देशपांडे आणि अरविंद चिंचुरे यांच्या उपस्थितीत या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

विविध क्षेत्रांतील २५ तज्ज्ञांनी राज्याच्या विकासाला पूरक आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या गरजांचा विचार करून शहरीकरण, मानवी जीवनमान, कायदे, शेती यांपासून कलासंस्कृती इत्यादी अनेक मुद्द्यांवर सविस्तर विवेचन आणि सुधारणांसाठी शिफारशी यात केल्या आहेत. कोणत्याही सरकारने पुढील पाच वर्षांत काय करावे, कसे करावे आणि का करावे, याचा ऊहापोह यात करण्यात आला आहे. तसेच, रोजगार निर्मिती करणारे उद्योग, कायदे सुधारणा, वित्तकारण, शेतीविषयक सुधारणा, शिक्षणातील सुधारणा, सार्वत्रिक आरोग्यसेवा, प्रशासन, व्यवस्थापन, जैवइंधनाचा वापर यांची व्यापक मांडणी यात आहे. त्यासाठी योगदान देणाऱ्या लेखकांनी त्यांची मते या वेळी मांडली. 

धोरणपत्रिकेतील मुद्दे हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात यांचा नक्कीच अंतर्भाव करू, असे या वेळी वंदना चव्हाण यांनी सांगितले. याबरोबरच राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करीत बनविलेल्या अशा धोरणांचा राज्याला नक्कीच उपयोग होईल, असे मत मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pathdarshika Publish