
लोणी काळभोर (पुणे) : मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, योग करा, प्राणायम करा अथवा ध्यान धरा, पण स्वतःसह आपल्या प्रियजनांना कोरोनापासून वाचवा...कारण, उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका चोविस वर्षीय तरुणासह पूर्व हवेलीमधील तीन जणांना सोमवारी (ता. २७) दिवसभरात प्राण गमवावे लागले आहेत.
उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल 36 तासांच्या कालावधीत कोरोनाचे बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तर, दुसरीकडे पूर्व हवेलीसह पुणे शहरामधील बहुतांश रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळत नसल्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान या पुढील काळात तरी स्वतःसह आपल्या प्रियजणांना कोरोनापासून वाचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरातील एक सत्तर वर्षीय रुग्णाचा सासवड येथील एका रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने सोमवारी (ता. २७) पहाटे मृत्यू झाला होता. ही बाब ताजी असतानाच नायगाव परिसरातील ६५ वर्षीय वृद्धाचा ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्याने सोमवारी रात्री उशीरा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. वरील ६५ वर्षीय रुग्णास मागिल पाच दिवसांपासून कुंजीरवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रविवारी (ता. २६) सकाळी श्वसनाचा त्रास वाढल्याने या रुग्णास ससून या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, ससूनसह पुण्यातील अनेक रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.
दरम्यान, कदमवाकवस्ती येथील २४ वर्षीय तरुणास चार दिवसांपूर्वी कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने, सुरवातीला त्याच्यावर घरीच उपचार सुरु केले होते. मात्र, दुसऱ्या दिवसी श्वसनाचा त्रास वाढल्याने त्याच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी लोणी काळभोर, शेवाळेवाडी, हडपसर, उरुळी कांचन व पुणे शहरातील विविध सात रुग्णालयात नेले होते. मात्र, या सातही रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने अखेर सासवड परिसरातील एका रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी बेड मिळाली होती. मात्र, सात वेगवेगळ्या रुग्णालयात नेत असताना झालेल्या हेळसांडेमुळे त्याची तब्येत अधिकच बिघाडली होती. यात सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले की, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल 36 तासाच्या कालावधीत कोरोनाचे बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधितांची संख्या दोनशेवर पोचली असून, वरील तीन ग्रामपंचायच हद्दीतच सध्या साठहून अधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. पूर्व हवेलीसह पुणे शहर व आसपासच्या तालुक्यामधील विविध रुग्णालयात सध्या बेड खाली नाही. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून दुर राहणे एवढाच मार्ग आपल्या हाती राहिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, योग करा, प्राणायम करा अथवा ध्यान धरा, पण स्वतःसह आपल्या प्रियजणांना कोरोनापासून वाचवा, अशी विनंती करण्याची वेळ आलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.