रुग्णांना भुर्दंड

रुग्णांना भुर्दंड

डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्यापेक्षा अधिक गोळ्या घेण्याची सक्ती

पुणे - डॉक्‍टरांनी औषधाच्या चिठ्ठीत लिहून दिलेल्यापेक्षा जास्त गोळ्या रुग्णांच्या माथी मारण्याचा प्रकार औषध विक्रेत्यांनी सुरू केला आहे. रुग्णाच्या हतबलतेचा फायदा घेऊन नफा कमविण्याचा उद्योग औषध विक्रेत्यांनी चालविला असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

रुग्णाच्या रोगाचे निदान करून त्याला कोणती, किती औषधे आणि किती दिवस द्यायची, अशी सविस्तर माहिती डॉक्‍टरांनी औषधाच्या चिठ्ठीत दिलेली असते; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा जास्त औषधे खरेदी करण्याची सक्ती विक्रेत्यांकडून होत आहे. शहरातील सिंहगड रस्ता, धायरी, कात्रज, वारजे, कोथरूड या भागांतील औषध विक्रेते प्रकर्षाने रुग्णांच्या नातेवाइकांकडून अशा प्रकारे लूट करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

अशी होते लूट
डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या पाच गोळ्यांऐवजी दहा गोळ्याच खरेदी करण्याची सक्ती रुग्णाच्या नातेवाइकांवर औषध विक्रेत्यांकडून केली जाते. डॉक्‍टरांनी पाच गोळ्यास घ्यायला सांगितल्या आहेत, असे सांगूनही औषध विक्रेत्याच्या काळजाला पाझर फुटत नाही. दहा गोळ्यांशिवाय औषध देणार नाही. ‘स्ट्रिप’ला कात्री लावणार नाही, असे सांगून दुकानदार दुसऱ्या ग्राहकाकडे वळतो. दुकानदाराला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केल्यास औषधाची चिठ्ठी आजच्या तारखेची आहे का, असा प्रतिप्रश्‍न ग्राहकाला विचारला होता. त्याचे उत्तर ‘हो’ असे दिल्यानंतर डॉक्‍टर ज्या भागातील आहेत, त्याच भागात औषधे मिळतील, ही औषधे आमच्याकडे नाहीत, असे सांगितले जाते. अखेर दहा गोळ्यांची ‘स्ट्रिप’ घेतल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होतो. 

नफेखोरीचे समर्थन
या गोळ्या खूप महाग असतात. सहसा कोणी ठेवत नाही. त्यांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्याचा खूप त्रास होतो. औषध निरीक्षकांना औषध विक्रीची स्पष्टीकरण द्यावे लागते, अशी यादी देऊन दहा गोळ्यांची खरेदी करण्याची सक्ती ग्राहकांना केली जाते. ‘स्ट्रिप’ला कात्री लावल्यानंतर शिल्लक राहिलेल्या गोळ्यांची विक्री होत नसल्याने नुकसान होते, अशी कारणे औषध विक्रेत्यांकडून दिली जात आहेत.

ग्राहकांचे अनुभव
आईला चक्कर आल्याने धायरी फाटा येथील पवन मेडिकलमध्ये औषध खरेदीसाठी गेलेला ग्राहक म्हणाला, ‘‘डॉक्‍टरांनी दिवसाला एक याप्रमाणे पाच गोळ्यांचा सल्ला दिला होता; पण दहा गोळ्या घेण्याची सक्ती औषध दुकानदाराने केली. त्यामुळे दुप्पट पैसे द्यावे लागत होते. त्याच्याशी वाद घातल्यानंतरही त्याने हे औषध दिले नाही. तसाच दुसरा अनुभव भारती हॉस्पिटलमधील औषध दुकानात निशिगंधा सुर्वे यांना आला. त्या म्हणाल्या, ‘‘लहान मुलगी आजारी असल्याने पाच गोळ्या डॉक्‍टरांनी सांगितल्या होत्या. त्याची किंमत २२४ रुपये होती; पण दहा गोळ्यांची सक्ती केल्याने ४४९ रुपये मोजावे लागले.’’

कायदा काय सांगतो?
डॉक्‍टरांनी औषधाच्या चिठ्ठीवर नमूद केल्याप्रमाणे फार्मासिस्टने औषधे दिली पाहिजेत. डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणेच गोळ्या देणे बंधनकारक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांनी विचारपूर्वक रुग्णाला औषधे दिलेली असतात. त्याच डोसप्रमाणेच विक्रेत्यांनी औषधे दिली पाहिजेत.’’

डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीप्रमाणेच फार्मासिस्टने औषध देणे बंधनकारक आहे. औषध विक्रेत्यांनी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना ‘कटिंग स्ट्रिप’ द्यावी, अशी सूचना यातून देण्यात येत आहे. वैद्यकीय सल्ल्यापेक्षा जास्त औषधे घेतल्यास त्याचा दुष्परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होण्याचा धोका आहे.
- जगन्नाथ शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष, औषध विक्रेता संघटना

करा औषध विक्रेत्याची तक्रार
डॉक्‍टरांनी दिलेल्यापेक्षा जास्त गोळ्या घेण्याची सक्ती करण्याचा अनुभव आपल्याला आल्यास त्या औषध विक्रेत्याची तक्रार ग्राहकांनी थेट ‘एफडीए’कडे ०२०-२४४६७२५९ या दूरध्वनी क्रमांकावर करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com