ना डोक्‍यावर छत, ना पुरेसे कपडे

अनुराधा धावडे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - ‘त्या’ अग्नितांडवानंतर ‘ते’ आजही बेघर आहेत. अर्धवट जळालेल्या घराची लाकडे गोळा करून पुन्हा घर बांधत आहेत. कडाक्‍याच्या थंडीतही त्यांच्या मुलांच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत. दोन वेळचे अन्न मिळतं; पण डोक्‍यावर छत नाही. तीन-चार दिवसांतून चाळीतील एका घरात अंघोळ करायची. दिवसाआड पाणी येतं, पण भांडी जळाल्यामुळे ते भरताही येत नाहीत. सुरवातीला कोणी कपडे दिले तर कोणी भांडी. मदतीचे हात थोडे दिवस पुढे आले; पण त्यानंतर कोणी लक्षच दिलं नाही. स्वतःच स्वतःला मदत करायची आणि घर उभारायचं.... ही परिस्थिती आहे पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील.

********************************
संबंधित वृत्त
पुणे : पाटील इस्टेट झोपडपट्टीत आग 
पाटील इस्टेट झोपडपट्टीत आगीचे थैमान
#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित
********************************

 काही दिवसांपूर्वी पाटील इस्टेट झोपडपट्टीत अचानक आग लागली होती. तेव्हा तेथील रहिवासी जीव वाचविण्याच्या भीतीने अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पळाले. आग झोपड्यांच्या मध्यभागी लागल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी खूप वेळ लागला, तोपर्यंत सर्व खाक झालं होतं. आग लागलेल्या प्रत्येक घरातील माणसांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गमावली. काही तासांतच होत्याचं नव्हतं झालं होतं.

पुष्पा गायकवाड म्हणाल्या, ‘‘चार दिवस सामाजिक संस्था, सरकारी अधिकारी, नगरसेवक सगळे येऊन गेले; पण त्यानंतर कोणीही इकडे फिरकले नाहीत. सरकारी मदतीचा तर मागमूसही नाही. आता स्थानिक रहिवासी मदत करतात; पण किती दिवस त्यांच्या मदतीची वाट पाहायची, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.’’  

सगळं उद्‌ध्वस्त झालं असलं तरीही, इथेच राहण्याची इच्छा रहिवाशांनी व्यक्त केली. स्वतःच्या जळालेल्या घराची राख उचलत पुन्हा घर बांधण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. सरकारने आम्हाला इथेच पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. सरकारने चार वासे आणि चार पत्रे देऊ केले; पण त्याने काय होणार?, असा प्रश्‍न येथील नागरिकांनी विचारला आहे.

आगीची घटना घडल्यानंतर सुरवातीला अनेक जणांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून गेल्यानंतर इकडे कोणी फिरकलेच नाहीत. ज्यांच्या घरात कर्ते पुरुष आहेत, ते कर्ज काढून पुन्हा घर बांधतीलही; पण आमच्या घरात फक्त महिलाच आहेत. आमचं घर कोण बांधेल? 
- मुन्नी शेख, रहिवासी

जळालेल्या कागदपत्रांची सोय करून देऊ; पण घराबाबत आम्ही सांगू शकत नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं. ‘एसआरए’मध्ये पात्र असलेल्यांना घरे मिळतील; पण ज्यांना पत्र नाही, त्यांनी जायचं कुठे?
- सविता काकडे, रहिवासी

Web Title: Patil estate fire case No roof no clothes