पवना धरण भरले 

पवना धरण भरले
पवना धरण भरले

पवनानगर  : पवन मावळ परिसरात संततधार सुरूच असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे पवना जलविद्युत केंद्रातून 1400, तर धरणाच्या सांडव्यातून 4200 असे एकूण 5600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साठ्यात चांगली वाढ झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत सहा दिवस आधीच धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे शनिवारी (ता. 3) सकाळी सहा वाजता जलविद्युत निर्मिती केंद्रातून 1400 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी अकरा वाजता धरणाच्या सांडव्यातून दरवाजा सहा इंचाने उघडून विसर्ग 2200 क्‍युसेक करण्यात आला. पाणीपातळी वाढल्याने दुपारी दीड वाजता वाजता दरवाजा एक फुटाने उचलून सांडव्यातून विसर्ग 4200 क्‍युसेक करण्यात आला. विसर्ग वाढल्याने अनेक पुलांवरून पाणी जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवश्‍यकतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी दिली. 

गेल्या चोवीस तासांत 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून ते आजअखेर 2133 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 
धरणात 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी 9 ऑगस्टला धरण शंभर टक्के भरले होते. यंदा 3 ऑगस्टलाच धरण शंभर टक्के भरले. पवना धरणातून पिंपरी- चिंचवडसह मावळात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, धरण 100 टक्के भरल्याने खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी उपविभागीय अभियंता अशोक शेटे, ए. एम. गदवाल, गजानन चिंचवडे, राजू खांडभोर, अमित कुंभार उपस्थित होते. 

मावळातील धरणे ओव्हरफ्लो 
वडगाव मावळ : मावळ तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महत्त्वाची सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली असून त्यातून विसर्ग सुरू ठेवला आहे. तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांत पडलेल्या दमदार पावसामुळे तालुक्‍याची वार्षिक सरासरी यापूर्वीच ओलांडली आहे. सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्‍यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाणे मावळातील वडिवळे धरण 95 टक्के भरले असून, धरणात 1.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून प्रतिसेकंद 3500 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. मंगरूळ गावाजवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून, धरणात 2.94 टीएमसी साठा असून धरणातून प्रतिसेकंद 1500 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. 

धोक्‍याच्या पातळीवरून वाहतेय कासारसाई 
सोमाटणे : पावसाचा जोर वाढल्याने कासारसाईचा विसर्ग शनिवारी (ता. 3) वाढविला असून, कासारसाई नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. कासारसाई धरण भरल्यानंतर गेल्या दहा दिवसांपूर्वी विसर्ग 500 क्‍युसेक सुरू होता. रात्री जोरदार पावसाला सुरवात झाल्याने धरणाची पाणीपातळी वेगाने वाढली. ती नियंत्रित करण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविला. सध्या 1400 क्‍युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्ग वाढविल्याने कासारसाई नदी कासारसाई, सांगवडे गावाजवळ धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. सांगवडे पुलावर पाणी आल्याने पुलावरची वाहतूक धोकादायक झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढविल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. 
पवना धरणातूनही विसर्ग सुरू केल्याने पवना नदीला पूर आला असून ती कोथुर्णे, शिवली, कडधे, थूगाव, बेबडओहोळ, धामणे, साळुंब्रे पुलाजवळ धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com