आचारसंहिता सरली  विकासकामे हलली 

Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation
Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation

पिंपरी : विधानसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल झाली. दिवाळी संपली आणि परतीच्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. यामुळे शहरातील विकासकामांना वेग आला आहे. प्रत्येक रस्त्यावर विविध वाहिन्यांसाठी खोदकाम, खड्डेमय रस्त्यांची डागडुजी, चर बुजविणे, काही प्रमाणात डांबरीकरण यांसह पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. 

विविध विकासकामे व सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यातील चार महिने रस्ते खोदाईस मनाई होती. त्यामुळे नवीन कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केलेले नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी खोदाई केलेल्या ठिकाणची कामे पूर्ण केली जात होती. पावसामुळे त्यास व्यत्ययही येत होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबरपासून लागू झाली. त्यामुळे महापालिकेच्या कारभाऱ्यांना कोणतेही निर्णय घेता आले नाहीत. सर्वसाधारण सभेसह स्थायी व इतर विषय समित्यांच्या सभा तहकूब केलेल्या होत्या. मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियमित व विशेष सभा घेऊन स्थायी समितीने सुमारे आठशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. त्यांची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यांतील बहुतांश कामांचे आदेश दिले होते. यात सर्वाधिक कामे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याबाबत होते. मात्र, मोसमीपाठोपाठ परतीच्या पावसाचा जोरही कायम राहिल्याने कामे सुरू झाली नव्हती. त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागला. आता दिवाळी संपली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल केली आहे आणि परतीच्या पावसानेही गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. 

खड्डे बुजवणे सुरू 
पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले होते. तातडीचा उपाय म्हणून मुरूम व माती टाकून ते बुजवले होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा खड्डे पडले. माती पसरून रस्ते निसरडे झाले होते. अशा ठिकाणी आता खडी व डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. शहराच्या 40 टक्के भागात सुरू असलेल्या 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला दिला आहे. या कामास विलंब होत असल्याने ठेकेदाराकडून बिलाच्या रकमेतून महापालिका दंडाची रक्कम वसूल करीत आहे. 

नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते वडमुखवाडी रस्त्यावर पावसामुळे खूप खड्डे पडले आहेत. खडी व डांबर टाकून ते बुजवले जात आहेत. त्याऐवजी संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करायला हवे.
- महेश पगारे, कामगार, चऱ्होली 


कामे रेंगाळण्याची भीती 
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे कामे सुरू झाली. मात्र, शुक्रवारी (ता. 1) दुपारी चारनंतर भोसरीसह शहराच्या काही भागात पुन्हा जोरदार पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सुरू झालेली विकासकामे पुन्हा रेंगळतात की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com