वर्दळीच्या ठिकाणी ओपन बार 

open bar
open bar

पिंपरी : शहरात वर्दळीच्या ठिकाणी ओपन बार सुरू असून याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे. यासंदर्भात शहरातील मुख्य ठिकाणांचा घेतलेला आढावा. 
वाइन शॉपसाठी अनेक ठिकाणी रहिवासी भागात परवानगी दिलेली आहे. मद्यपी शॉपमधून मद्य घेऊन ते शॉपसमोर अथवा थेट रस्त्याच्या कडेला मिळेल तेथे बैठक मांडतात. अनेकदा त्यांच्यात वाद होऊन हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

चिंचवड स्टेशन चौक : वाइन शॉप चौकात असून शॉपसमोरच मद्यपींची बैठक होती. शेजारीच रिक्षा स्टॅंड असल्याने येथे प्रवासी येथे होते. मात्र, मद्यपींच्या घोळक्‍यामुळे सामान्य नागरिकांना येथून ये-जा करतानाही नकोसे होत असल्याचे दिसून आले. 

निगडी, टिळक चौक : निगडीतील हा मुख्य चौक असून येथील शॉपच्या परिसरातील हातगाड्यांवर मद्यपींची गर्दी होती. या परिसरात खासगी क्‍लास, मुख्य बसथांबा, दवाखाना असल्याने महिलांसह महाविद्यालयीन विद्यार्थिनींची वर्दळ असते. "ओपन बार'मुळे त्या मार्ग बदलून जात होत्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी : या चौकातून पिंपरी कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा पदपथावर, पीएमपी बस थांब्याच्या शेडमध्ये मद्यपी बसलेले होते. बसची वाट पाहत उभे असलेले प्रवासी थांब्यापासून दूर थांबले होते. सोबत असलेल्या छोट्या मुलांना हे चित्र दिसू नये यासाठी पालक त्यांना स्वत:च्या आडोशाला उभे करीत होते. 

अजमेरा कॉलनी : सम्राट चौकाकडून अजमेरा कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर रहिवासी भागात वाइन शॉप आहे. मद्यपी येथे रस्त्यालगतच बसतात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करतानाही त्रास होतो. 

चिखली, कोयनानगर : पेठ क्रमांक 19 येथे रहिवासी भागातच वाइन शॉप आहे. रस्त्यावर, पदपथावर मद्यपी बसलेले असतात. त्यांच्यात अनेकदा वाद होतात. महिलांच्या छेडछाडीच्याही घटना घडत असल्याने येथून ये-जा करतानाही नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना असते. 

रहदारीस अडथळा 
वाइन शॉपसमोरील रस्त्यावर अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या चणे, फुटाणे विक्रीच्या टपऱ्यांवर मद्यपींची गर्दी असते. त्याचा रहदारीस अडथळा होतो. 

नागरिकांचा संताप 
"ओपन बार'मुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. भीतीपोटी काहीजण तक्रार करत नाहीत. मात्र, ज्यांनी केली त्याची दखलही घेतली जात नाही, असे काहींचे म्हणणे आहे. 

अभय कोणाचे? 
रहिवासी भागात वाइन शॉपसह रस्ते, पदपथांवर टपऱ्या थाटलेल्या आहेत. ते कोणाच्या आशीर्वादाने, रहिवासी भागात असे शॉप सुरू होताना लोकप्रतिनिधींकडून विरोध का होत नाही? स्थानिक नगरसेवक याकडे डोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com