Ayodhya Verdict : अयोध्या निकालानंतर पिंपरीत होते 'असे' वातावरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शनिवारी (ता. 9) कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शांततेचे वातावरण होते. या निकालानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मागील आठवड्यापासूनच तयारी सुरू केली होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. 

पिंपरी (पुणे) : अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शनिवारी (ता. 9) कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शांततेचे वातावरण होते. या निकालानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मागील आठवड्यापासूनच तयारी सुरू केली होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. 

नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यासह सर्वधर्मीय पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य व नागरिकांच्या बैठकीचेही आयोजन केले होते. न्याय व्यवस्थेकडून जो निर्णय दिला जाईल, त्याचा सन्मान करावा, त्याबाबत कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन, रॅली, घोषणाबाजी करू नये, सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नये, समाजात तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी ठिकठिकाणी रूटमार्चही काढण्यात आले होते. शहरातील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. 

शुक्रवारी (ता. 8) रात्री अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील पोलिस यंत्रणा अधिक सज्ज झाली. रात्रीपासून गस्त वाढविली. यासह शनिवारी सकाळी लवकरच शहरातील प्रमुख चौकांसह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाटनगर, लालटोपीनगर, नेहरूनगर, काळेवाडी, दापोडी, चिंचवड गावातील चापेकर चौक, निगडीतील टिळक चौक, ओटास्किम, रुपीनगर, चिखली पीएमटी चौक, कुदळवाडीतील डायमंड चौक, भोसरीतील उड्डाण पुलाखाली पोलिस तैनात होते. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याने शहरात शांततेचे वातावरण होते. 

चिंचवड गावातील भाजी मंडईत नेहमीप्रमाणे खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. यासह तुळसी विवाहासाठी खरेदीचीही लगबग सुरू होती. चिखलीतील मुख्य चौकातील पीएमपी बसथांब्यावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती. तर कुदळवाडीतील व्यावसायिकदेखील कामात व्यग्र होते. निगडीतील ओटास्किम, रुपीनगर, पिंपरीतील भाटनगर, काळेवाडी या भागातीलही जनजीवन सुरळीत सुरू होते. 

पोलिस आयुक्त उतरले रस्त्यावर 
पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई हे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन सुरक्षेचा आढावा घेत होते. बंदोबस्ताची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात असून, बंदोबस्तासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह काही जणांना ताब्यातही घेतले आहे. शहरात गस्त सुरू असून, प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. 
- संदीप बिष्णोई, पोलिस आयुक्त 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a peaceful atmosphere in pimpri chinchwad after the Ayodhya result