घाऊक बाजारात शेंगदाणा महागला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुणे : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे साबूदाणा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने घाऊक बाजारात साबूदाण्याच्या भावात पंधरा दिवसांत किलोमागे 5 रुपयांनी घसरण झाली आहे. तर, शेंगदाण्याच्या भावात सात रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली. 

देशात केवळ तमिळनाडू येथील सेलम भागात साबूदाण्याचे उत्पादन घेतले जाते. लोढा म्हणाले की, मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज 150 ते 200 टन साबूदाणा दाखल होत आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने मागणीत नेहमीच्या तुलनेत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नवरात्रीपर्यंत साबूदाण्याला मागणी राहणार आहे.
सध्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने भावात घसरण झाली आहे. भावात चढ-उतार होण्याची शक्‍यता आहे. घाऊक बाजारात 1 नंबर साबूदाण्याला किलोस 78 रुपये, दोन नंबर साबूदाण्याला 75 रुपये, तीन आणि चार क्रमांक साबूदाण्याला अनुक्रमे 70 आणि 68 रुपये भाव मिळत आहे. 
तर शेंगदाण्याविषयी ते म्हणाले की, शेंगदाण्यालाही मागणी वाढली आहे. मात्र, सध्या खराब माल बाजारात जास्त येत आहे. आवक पैकी केवळ 10 टक्के मालच चांगला आहे. मध्य प्रदेश येथून येणारा मेनपुरी शेंगदाणा सध्याच्या वातावरणात केवळ चार दिवसांत खराब होत आहे. बाजारात सध्या दररोज 150 ते 200 टन शेंगदाण्याची मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाटकातून आवक होत आहे. घाऊक बाजारात हलक्‍या मालाला किलोस 80 ते 85 रुपये, तर दर्जेदार मालास 110 ते 120 रुपये भाव मिळत आहे. भावातील तेजी दसऱ्यापर्यंत राहण्याचा अंदाजही लोढा यांनी वर्तविला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peanuts price increased