पादचाऱ्यांची किंमत शून्य

पादचाऱ्यांची किंमत शून्य

पुणे  - देशातील ‘स्मार्ट सिटी’त दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुण्यात पादचाऱ्यांची किंमत शून्य असल्याचे समोर आले आहे. कारण, शहरातील ६५ टक्के रस्त्यांना पदपथ नाहीत, तर ५४ टक्के रस्त्यांवर ‘लेन मार्किंग’ नाही. अशा स्थितीत आम्ही रस्त्यावरून चालायचं कसं, असा सवाल पुण्याच्या कारभाऱ्यांना विचारला जात आहे. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) एल अँण्ड टी इन्फ्रा इंजिनिअरिंगने सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. त्यातून रस्त्यांबाबतची ही माहिती पुढे  आली आहे. 

शहरातील रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांना पावलोपावली अडथळे असतात. पदपथ असेल तर त्यातील अतिक्रमणांचे, पदपथ नसलेल्या रस्त्यांच्या कडेपर्यंत येऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अडथळे पार करत रस्ता ओलांडण्याची कसरत दर दिवशी आपल्याला करावी लागते. या कारणांचे मूळ या अहवाल सापडले आहे. शहरातील ३५ टक्के रस्त्यांच्या एका आणि दोन्ही बाजूला पदपथ आहेत, तर ६५ टक्के रस्त्यांवर पदपथ नाहीत.

‘लेन मार्किंग’चा अभाव
सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यांवर ‘झेब्रा क्रॉसिंग’ हवेच. त्याचप्रमाणे चालकांना वाहन चालविणे सुलभ होण्यासाठी रस्त्यांवर ‘लेन मार्किंग’ आवश्‍यक असते. अशा चांगल्या ‘लेन मार्किंग’चे प्रमाण पुण्यात जेमतेम तीन टक्के आहे. ५४ टक्के रस्त्यांवर याचा अभाव आहे. 

अपघाताचा वाढतोय धोका
कोणताही रहदारीचा रस्ता ओलांडताना तरुणांना पहिले पाऊल टाकताना सर्व हिंमत एकवटावी लागते. अशा स्थितीत कोणाच्याही मदतीशिवाय शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी रस्ता ओलांडण्याचा विचारही आपण करू शकत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये २३८ पादचाऱ्यांना अपघातात प्राण गमवावे लागल्याची नोंद पुणे पोलिसांकडे झाली आहे. 

असा केला आराखडा
पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका आणि त्यांच्या परिसरातील वेगाने शहरीकरण होणाऱ्या गावांचा अभ्यास ‘सीएमपी’मध्ये करण्यात आला आहे. पुण्यातील रस्त्यांचे बारकाईने विश्‍लेषण या आराखड्यात केले आहे. रस्त्यांवर पदपथ आहेत का, लेन मार्किंग आहे का, असलेल्या मार्किंगचा दर्जा कसा आहे, रस्त्यावर वीज आहे का, या प्रत्येक घटकाचा यात अभ्यास केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com