रखडलेल्या शस्त्रक्रियांचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

ससून रुग्णालयातील सेवा पूर्ववत; नव्या रुग्णांची नोंदणी

पुणे - कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपलब्ध करून दिल्याने ससूनमधील रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे. सामूहिक रजेच्या काळात पुढे ढकललेल्या शस्त्रक्रियांवर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे. रजेच्या काळात नियोजित केलेल्या शस्त्रक्रिया या आठवड्यात पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, या आठवड्यात नव्याने येणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात येत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीतील शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था आहे. 

कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या मागणीसाठी राज्यातील १४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे चार हजार ५०० निवासी डॉक्‍टरांनी पाच दिवस सामूहिक रजा घेतली होती. त्यात पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील तीनशे निवासी डॉक्‍टरांचा समावेश होता. त्यामुळे या महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली होती. नियोजित लहान आणि मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रयोगशाळेतील तपासण्यांची संख्या कमी झाली होती. दररोज होणाऱ्या सुमारे चाळीस प्रसूतींची संख्याही अकरापर्यंत खाली आली होती. रुग्णालयात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निवासी डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करत असल्याने सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. 
 
असे केले नियोजन
सामूहिक रजेच्या काळात काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्या तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रुग्णांशी संपर्क करणे, त्यांना शस्त्रक्रियेसाठी वेळ देणे ही प्रक्रिया सुरू आहे. या आठवडाभरात नियोजन करून या शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती या विभागातून देण्यात आली. 

या आठवड्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात येत आहे. त्या शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात करण्यात येतील. यात तातडीच्या शस्त्रक्रियांचा समावेश नाही. 

रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांच्या संख्येवर निर्बंध घातले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. अगदी दोन नातेवाइकांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांवरील तणाव कमी झाला आणि विस्कळित झालेली रुग्णसेवा अत्यंत कमी वेळात पूर्ववत करता आली. 
 
ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया, उपचार आणि प्रयोगशाळांमधील वेगवेगळ्या चाचण्या नियमित होत आहेत.
- डॉ. अजय चंदनवाले, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता

Web Title: pending surgery management