पेन्शनर आहात? कॉलपासून सावध राहा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - ‘हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,’ असा कॉल ज्येष्ठ नागरिकांना येत असेल, तर तो खोटा आणि बनावट कॉल असेल. असा कॉल आल्यास ज्येष्ठांसह सर्व कर्मचाऱ्यांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगून पोलिसांकडे तत्काळ संबंधित फोन नंबर आणि व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पुणे दोनचे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमिताभ प्रकाश यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयातून अशा प्रकारे फोनकॉल केले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही आठवड्यांपासून ‘पीएफ’ कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून काही निवृत्तिवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना कॉल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दिल्लीतील मोबाईल क्रमांकावरून असे कॉल येत असल्याचे तक्रारदारांनी आकुर्डी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविले आहे.

अज्ञात व्यक्तींकडून पीएफच्या रकमेवर बोनस देण्यासाठी काही रक्कम एका बॅंक खात्यात जमा करण्यासाठी कॉल केला जातो. त्या वेळी संबंधितांच्या पीएफ व निवृत्तिवेतनाच्या रकमेसंदर्भात माहिती घेतली जाते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत कार्यालयाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण केले आहे. 

आमच्या कार्यालयात अशा प्रकारे दिल्लीस्थित व्यक्तीकडून फोन आल्याची तक्रार आली. त्याला निवृत्तिवेतन वाढणार असल्याचे सांगत एका बॅंक खात्यामध्ये काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी संबंधित व्यक्ती आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मात्र, आमच्या कार्यालयातून कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडून कोणालाही कॉल केला जात नाही. 
- अमिताभ प्रकाश, क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, पुणे दोन.

ही घ्या काळजी...
 खात्याविषयी माहिती देऊ नका
 आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा.
 संशयास्पद कॉल आल्यास तत्काळ पोलिस आणि कार्यालयाशी संपर्क  साधावा.

Web Title: Pensioner Call Alert Cheating