कोरोना परवडला; पुन्हा लॉकडाउन नकोच!

people dont support Lockdown corona Virus Pune city News
people dont support Lockdown corona Virus Pune city News

पुणे : अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचा विचार, या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या वक्तव्यांमुळे बाजारपेठेची झोप उडाली आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक लॉकडाउनच्या संकटामुळे धास्तावले असून जेमतेम सुरू असलेले अर्थचक्र पुन्हा बंद झाले तर, कसे होणार असा प्रश्न परवडला आहे. कोरोनाचा सामना करू पण, लॉकडाउन परवडणारा नाही, असेच बहुसंख्य व्यावसायिक-दुकानदारांचे म्हणणे आहे.

पुण्यातील लॉकडॉउनबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी निर्णय घेण्यात येईल, असे राव यांनी पाच मार्च रोजी जाहीर केले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शाळा, महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची पावले लॉकडाउनच्या दिशेने पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजअॅण्ड अँग्रिकल्चरसह (एमसीसीआयए) उद्योजकांच्या अनेक संघटनांनी नियोजित लॉकडाउनला विरोध केला आहे. कोरोनासाठीच्या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणीची यंत्रणा प्रशासनाने कार्यरत करावी परंतु, अर्थचक्र बंद करू नका, असे पुणे व्यापारी महासंघासह अनेक संघटनांनी म्हटले आहे.

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनमधूनच उद्योजक, व्यावसायिक अद्याप सावरलेले नाहीत. केटरिंग, मांडव, हार, बॅन्ड आदी व्यवसाय अद्याप सुरू झालेले नाहीत. हार्डवेअर, स्टेशनरी, कापड, गिफ्ट आर्टिकल्स आदींचे व्यवसायही सुरळीत झालेले नाहीत. त्यातच पुन्हा लॉकडाउन आला तर, व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडणारा हा प्रकार असेल. दुकाने बंद करण्याचा आदेश देणे सोपे आहे परंतु, बाजारपेठेतील आर्थिक चक्र सुरू करणे अवघड आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

लॉकडाउनचा परिणाम (आर्थिक पाहणी अहवाल)
- हॉटेल, उपहार गृहे, वाहतूक - २०.४ टक्के
- बांधकाम क्षेत्र - उणे १४.६ टक्के
- उद्योग क्षेत्र - उणे ११.५ टक्के
- वस्तुनिर्माण - उणे ११.८ टक्के
- सेवा क्षेत्र - उणे ९ टक्के
- राज्याच्या महसुलातील घट - सुमारे ३५ टक्के


''पहिल्या लॉकडाउनमधूनच दुकानदार अजून सावरलेले नाहीत. कारण एप्रिल, मे, जून या सिझनच्या कालावधीत गेल्यावर्षीही लॉकडाउन होता. त्यामुळे त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यंदाही सिझनवर लॉकडाउनचे सावट आहे. लॉकडाउन करणे सोपे आहे, परंतु, व्यवसायाची गाडी पूर्वपदावर येणे अवघड आहे. दुकाने ठेवण्याचा निर्णय झाला तर, कापड व्यावसायिक देशोधडीला लागतील''
- राहुल बोरा, लक्ष्मी रस्ता व्यपारी असोसिएशन

''आइस्क्रीम, कुल्फी व्यवसाय गेल्यावर्षी थंडावला. यंदा व्यवसाय होईल, असे वाटत होते. त्यामुळे त्यात जानेवारी- फेब्रुवारीमध्ये गुंतवणूक केली. परंतु, आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा आहे. त्यामुळे सगळ्यांचेच जबर नुकसान झाले. गेल्या वर्षी १५ लाखांचा माल फेकून द्यावा लागला होता. यंदा २५ लाखांचा माफ टाकून द्यावा लागेल. त्यामुळे लॉकडाऊन आणायचा असेल तर, लाखवेळा विचार करा, अशी हात तोडून विनंती आहे.''
- राहुल पापळ, कुल्फी उत्पादक

''लॉकडाउन हा काही उपाय आहे का? उत्पादन बंद ठेवले तर, कच्च्या मालाचे काय कराचे, कामगारांचा पगार आहे, तयार केलेले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवायचे कसे, असे अनेक प्रश्न आहेत. विजेचे बिल पण आहेच. बॅंकांचे हप्ते सुरू आहेत. त्यांच्याकडून व्याजात माफी मिळत नाही. हप्ते थकले तर, लगेच नोटिसा येतात. अशा परिस्थितीत उद्योग- व्यवसाय कसा करायचा? छोट्या दुकानदारांचे तर खूपच हाल होतात, याचा विचार करा.''
- अमित महल्ले, इलेट्रॉनिक्स उत्पादक

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 

उपाय काय आहेत
- कोरोनाच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष हवे
- नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज
- सार्वत्रिक लसीकरण होण्याची गरज
- खासगी रुग्णालयांत लस सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे
- महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करणे गरजेचे


लॉकडाउनऐवजी
- आठवड्यातून १ दिवस बाजारपेठा बंद करा
- सकाळी १० ते रात्री ८ बाजारपेठ खुली ठेवा
- व्यवसाय-व्यापार सुरू राहील, असे निर्बंध हवेत

माध्यमातील 'स्त्री' प्रतिमा कशी ?; त्याचे उत्तर 'चित्रभाषेत' 

पुन्हा लॉकडाऊन नको : उत्पादन आणि सेवा क्षेत्र  

सेवा क्षेत्रातील घट भरून काढणे अवघड

कोरोनाच्या संकट काळात संपूर्ण अर्थ व्यवस्थाच कोलमडली, त्यात उत्पादन क्षेत्राची गाडी आता कुठे हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. मात्र, सेवा क्षेत्राला सावरायला बराच वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुन्हा लॉकडाउन झाल्यास सेवा क्षेत्र पुन्हा कोलमडून जाईल, अशी चिन्हे आहेत.

राज्याचा नुकताच सादर झालेला आर्थिक अहवाल पाहिला, तर त्यात गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेत आठ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते. त्यात सेवा क्षेत्रात सर्वाधिक घट ही हॉटेल्स्‌, रेस्टॉरंट यामध्ये २०.४ टक्के इतकी झाल्याचे निदर्शनास येते, तर बांधकाम क्षेत्रात ती १४.६ टक्के व वास्तुनिर्माण क्षेत्रात ११.८ टक्के इतकी आहे. या क्षेत्रात लॉकडाउन केल्यास त्याचा परिणाम मालकांबरोबरच त्यात काम करणाऱ्या कामगारांवर (आणखी अधिक) होतो. त्यामुळे लॉकडाउनऐवजी, सरकारने लसीकरण वाढवणे आणि उद्योग आणि जनसामान्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी दिलेल्या नियमावलीचे त्या-त्या पातळीवर काटेकोर पालन हे जास्त सयुक्तिक ठरेल.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए)

कामगार वर्गाचे हाल होतील
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी लॉकडाउन झाला, त्यावेळी पहिल्याच टप्प्यात उत्पादन क्षेत्र ‘बंद’ करण्यात आले. सतत सुरू असणारे उत्पादनाचे चक्र अचानक ठप्प झाले आणि पुन्हा ते सुरू करण्यासाठी अपार कष्ट करावे लागले. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे वास्तव असले, तरीही पुन्हा लॉकडाउन झाल्यास उत्पादन क्षेत्रातील यंत्र, मनुष्यबळ, कच्चा माल अशा सर्वच गोष्टींवर त्याचे पडसाद उमटतील, अशा शब्दांत उत्पादन क्षेत्रातील तज्ञांनी आपले म्हणणे मांडले आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजअॅण्डअॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) उपाध्यक्ष दीपक करंदीकर म्हणाले, ‘‘पुन्हा लॉकडाउन झाल्यास त्याचा सर्वांत मोठा फटका उत्पादन क्षेत्राला बसणार आहे. उत्पादन क्षेत्रात यंत्र (मशिन), मेथड्‌स (कार्यपद्धती), मनुष्यबळ (मॅन) आणि मटेरिअल (माल) हे सगळ्यात महत्त्वाचे असते. उत्पादनाचे हे चक्र ठप्प झाल्यास ते पुन्हा सुरू करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यात सगळ्यात जास्त कामगार वर्गाचे हाल होतात.’’

पुन्हा लॉकडाऊन म्हणजे शिक्षणाचा खेळखंडोबा  

कोरोनात कसे वागायचे हे लोकांना कळले आहे, सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, तरीही कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन करून शाळा- महाविद्यालये बंद केले तर शिक्षणाचा खेळखंडोबा होणार आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे दिवसभरात दोन, तीन बॅचमध्ये शिक्षण देता आले तरी चालेल; पण लॉकडाउन नको, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढीमुळे २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता १४ मार्चपर्यंत सर्व संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून आणखी निर्बंध आणण्याचा प्रयत्न आहे; पण याचे दूरगामी परिणाम विद्यार्थी, प्राध्यापकांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे काही करा; पण लॉकडाउन नको अशी मागणी होत आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विज्ञान शाखेचे प्रॅक्टिकल ठप्प आहेत. ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. प्रॅक्टिकल नसल्याने विद्यार्थ्यांना विषय पूर्ण समजलेले नाहीत. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिकल सुरू झाले होते; पण आता महाविद्यालये बंद झाली आहेत. शैक्षणिक वर्ष कोलमडून गेले असताना पुन्हा लॉकडाउन केल्यास याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे १४ मार्चनंतर पूर्णपणे खबरदारी घेऊन महाविद्यालये दोन, तीन बॅचमध्ये महाविद्यालयात थेट शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे काही प्राचार्यांनी बोलताना सांगितले.

''कोरोनाबद्दल लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. उपचाराची तयारी आहे, लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे नुकसान झाले आहे; पण आणखी नुकसान होऊ नये. सावधगिरी बाळगून महाविद्यालयांमधील थेट शिक्षण सुरू ठेवता येईल. शासनाने फक्त इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे.''
- अॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शि. प्र. मंडळी


पडद्यामागील कलाकारांच्या मनात धडधड
चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी स्पॉटबॉय म्हणून काम करत होतो. महिन्याला १०-१५ हजार रुपये मिळायचे. त्यातच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. पण कोरोनामुळे लॉकडाउन लागला आणि दुसऱ्या दिवसापासून लेकराबाळांना दोन वेळेचे जेवण कुठून, कसे द्यायचे असा प्रश्‍न पडला. कसेबसे काही महिने काढले, आता काम सुरू झाले. पण आता पुन्हा लॉकडाउन लागले, तर आमच्यापुढे कुटुंबासमवेत आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसेल, हे शब्द आहेत लॉकडाउनच्या धास्तीने हादरलेल्या स्पॉटबॉय विक्रमचे. चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनच्या भीतीने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे.

लॉकडाउनची चर्चा रंगू लागल्याने स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट, कॉश्‍युम असिस्टंट, आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांच्या मनात ‘धडधड’ वाढली आहे.

कार्यकारी निर्माते संजय ठुबे म्हणाले, ‘‘मागील लॉकडाउनमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, मोठे कलाकारांच्या मदतीमुळे पडद्यामागील कलाकार किमान जगू शकले. आता चित्रीकरणाच्या कुठे कामाची घडी हळूहळू बसू लागली आहे. त्यात पुन्हा लॉकडाउन लागला, तर चित्रपट उद्योग लवकरच संपुष्टात येईल, अशी शक्‍यता नाकारता येत नाही. हजारो पडद्यामागील कलाकारांचे पोट चित्रपट निर्मितीच्या कामावर अवलंबून आहे. हाताला काम नसेल, तर या कष्टकऱ्यांनी जगायचे तरी कसे? आम्ही सरकारचे सगळे नियम पाळतो, पण लॉकडाउन नको.’’

मागचे दिवस पुन्हा नको
मागील वर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घरातील खर्च, मुलांचे शिक्षण अशा बाबींचा खर्च भागविणे देखील मुश्कील होते. त्यामुळे आता मागचे दिवस पुढे येऊ नये अशी अपेक्षा टपरी चालक, छोटे दुकानदार, किरकोळ स्वरूपात वस्तू विकणारे व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. लॉकडाउनच्या ऐवजी काही निर्बंध लावून व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यावसायीक करीत आहेत.

‘‘संपूर्ण कुटुंबासोबत पुण्यात व्यवसायासाठी आलो होतो. कर्ज काढून दुकानात भरलेला माल लॉकडाउनमुळे विकलाच गेला नाही. तसेच घर आणि दुकानाचे भाडे भरणे पण अवघड झाले. त्यामुळे आता दुकान कायमचे बंद करण्याची वेळआली. सध्या भांड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. जर पुन्हा लॉकडाउन झाले तर हा व्यवसाय सुद्धा बंद करण्याची वेळ माझ्यावर येऊ शकते,’’ अशी भीती छोटे व्यावसायिक किशन गोस्वामी यांनी व्यक्त केली.

''लॉकडाउनमुळे अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. घराचा हप्ता आणि दुकानाचे भाडे भरता आले नाही. त्यामुळे कर्जाचे ओझे आणखी वाढले आहेत. लॉकडाउनमध्ये भाज्या विकून दोनवेळचे जेवण मिळवत होतो. सरकारने आमच्यासारख्या व्यावसायिकांकडे लक्ष द्यावे आणि लॉकडाउनऐवजी दुसरा पर्याय काढावा.''
- हिराराम पटेल, कपड्यांचे विक्रेते

नागरिक म्हणतात...

''सर्वसामान्य माणूस पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे चिंताग्रस्त आहे. त्यात जर लॉकडाउन झाले तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. प्रशासनाने कडक निर्बंध घालावेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेने निर्जंतुकीकरणासाठी व्यवस्था करावी. शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे; पण लॉकडाउन हा त्यावरील उपाय नाही.''
- कुंदन कड, अभियंता

''लॉकडाउन झाले तर सर्वसामान्यांची सर्वांत मोठी हानी होईल. त्यात उपासमारी, बेरोजगारीचे संकट ओढावत आहे. माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे माझ्या व्यवसायावर अवलंबून आहे. लॉकडाउन करू नये, हीच आमची प्रशासनाला विनंती आहे.''
-विलास शिंदे, व्यावसायिक

''पहिल्या लॉकडाउनमधून अजून नागरिक सावरले नाहीत. पुस्तक विक्रेत्यांवर अॅमेझॉनच्या ऑनलाइन पुस्तक विक्रीमुळे संकट कोसळले आहे. पुस्तकांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे आमच्यावर आर्थिक संकट आले आहे. सरकारने लॉकडाउनचा फतवा काढू नये.''
-शेखर यादव, पुस्तक विक्रेते

''गेल्या पूर्ण वर्षात सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या प्रचंड खचला आहे. वर्षभर लोकांना रोजगार मिळाला नाही. आता कुठे सुरळीत चालू झाले आहे. रोजचा पोटापाण्याचा प्रश्‍न आहे. पूर्ण वर्ष आम्ही व्यवसाय तोट्यात केला आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. प्रशासनाने लॉकडाउन करू नये.''
- विशाल भोईटे, चहा विक्रेते

''कडक नियमावली करा. लॉकडाउन परत करू नका. कारण त्याचा सर्वांत मोठा फटका सर्वसामान्यांना व व्यावसायिकांना बसलेला आहे. शासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना वेतन चालू होते; पण आमच्या छोट्या व्यावसायिकांचा कोणीही विचार केला नाही.''
-श्रीकांत महाडिक, इलेक्ट्रीकल्स दुकानदार

''लॉकडाउन काळात सर्वांत मोठे संकट छोट्या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींवर आलेले दिसते. लॉकडाउनमध्‍ये कडक बंद असल्यामुळे आमच्यासारख्या असंख्य फुलविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातुनच सावरत असताना सध्‍या कुठेतरी आम्ही पूर्वपदावर येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यावर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा विचारही करू नये.''
-सुहास लेंडघर, फुलविक्रेते
 

''लॉकडाउनमुळे हॉस्पिटलचा खर्च, बॅंकांचे हाप्ते अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. रिक्षा चालवली तरच आमचे पोट भरते. सध्या दुसरी लाट येणार असल्याचे कळते आहे. त्यातच कमी लोक घराबाहेर पडत नसल्यामुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे.''
- गुलाब सातव, रिक्षाचालक
 

''कोरोना काळात आमच्या व्यवसायावर गदा आली होती. लॉकडाउनमुळे दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, त्यात लोकांची कोरोनाच्या भीतीमुळे आमच्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. अजूनही परिस्थिती बदललेली नाही. सुरक्षा असूनसुद्धा लोकांपर्यंत आम्हाला पोहचता येत नाही. आर्थिक नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्ण वाढत आहे; परंतु प्रशासनाने लॉकडाउन करू नये.''
- अक्षय जाधव, सलूनचालक
 

''लोक नियमांचं उल्लंघन करत आहेत. प्रशासन गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेत नसल्याने कोरोना नियंत्रणात येत नाही. एक वेळेस निर्बंध आणावेत; पण लॉकडाउन करू नये. लॉकडाउनचा आर्थिक परिणाम हा सर्वसामान्यांवर होत आहे आणि विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.''
- राजेंद्र हुले, नागरिक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com