esakal | 'कामाचे ठिकाण ते घर' प्रवासास परवानगी; उद्योगांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

pune corona

'कामाचे ठिकाण ते घर' प्रवासास परवानगी; उद्योगांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- कामाच्या ठिकाणी कामगार स्वतःच्या वाहनातूनही जाऊ शकतो, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी देण्यात आले. तसेच लघु उद्योगांतील अन्नप्रक्रिया उद्योगांना उत्पादन आणि वितरणाला कोणतीही आडकाठी नसेल, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात आजपासून संचारबंदी लागू झाली. त्याचा आदेश प्रसिद्ध करताना उद्योगांबाबतच्या काही निर्बंधांमुळे उद्योग- व्यावसायिकांत काही संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे या बाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅंड अॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) पुढाकार घ्यावा, असे आवाहन अनेक उद्योगांनी केले होते. त्याची दखल घेऊन चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी ऑनलाईन बैठक बुधवारी आयोजित केली. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते. त्यांनी सुमारे 1100 उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सुमारे 20 हून अधिक उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचाही त्यात समावेश होता.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील साडेचारशे ग्राम पंचायती कोरोनामुक्त; भोर तालुक्याची आघाडी

उद्योग सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी, त्यासाठी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी उद्योगांनी काटेकोरपणे करावी, असे सौरभ राव यांनी बजावले. तसेच कामाच्या ठिकाणी शक्य असेल त्या उद्योगांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले. तसेच मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान काही उद्योगांनी परवानग्या घेतल्या असतील, तर त्या यंदाही वैध राहतील, असे सुरवसे यांनी स्पष्ट केले. मेहता यांनी स्वागत करून बैठकीच्या आयोजनाचा उद्देश प्रास्ताविकात स्पष्ट केला तर, गिरबने यांनी आभार मानले.

उद्योग सुरू ठेवताना उद्योजकांना काही अडचणी आल्यास त्यांनी diropune@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, त्यांना तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, असे विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी स्पष्ट केले.

उद्योगांच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

- फार्मा आणि इक्किपमेंट, अॅग्रीकल्चर आणि इक्विपमेंट, फूड प्रोसेसिंग, डेअरी, आयटी, कोल्ड स्टोरेज, खते आणि संबंधित उत्पादने, व्यवसाय आदी उद्योग अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू राहणार, त्यांच्याशी संबंधित सर्व सूक्ष्म,लघु, मध्यम आणि मोठे उद्योग सुरू राहणार

- अत्यावश्यक सेवेतील उद्योगांशी संबंधित उत्पादनांची वाहतूक, वितरण सुरू राहणार

- आयात- निर्यात करणाऱ्या उद्योगांच्या पुरवठा साखळीतील घटक (सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर यांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश)

- कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणी स्वतःच्या किंवा कंपनीच्या वाहनाने जाऊ शकणार, घर ते कामाचे ठिकाण, एवढ्याच प्रवासाला परवानगी