पुणे : पेटीएमकडून कार लागल्याचे सांगत सव्वासात लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- कार किंवा साडेबारा लाख रुपयांचे बक्षिस लागल्याचे भासवून एका नागरिकाला तब्बल सव्वासात लाख रुपयांना फसविण्यात आले.

पुणे : कार किंवा साडेबारा लाख रुपयांचे बक्षिस लागल्याचे भासवून एका नागरिकाला तब्बल सव्वासात लाख रुपयांना फसविण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

याप्रकरणी कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या 38 वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 27 ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना एक मेसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादीला फोन आला. आपण पेटीएम मॉल कंपनीकडून बोलत असून, तुम्ही पेटीएम कंपनीचे भाग्यवान विजेते ठरले आहात. त्यामध्ये एक बक्षिस देण्यात येणार असून, त्यासाठी 12 लाख 60 हजार रूपयांची रोख रक्कम किंवा क्रेटा कंपनीची कार असे दोन पर्याय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी फिर्यादी यांच्याशी मोबाईलद्वारे सातत्याने संपर्क ठेवला. त्यांनतर बक्षिस मिळविण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्याकडून एका बॅंकेच्या खात्यावर सव्वासात लाख रुपयांची रक्कम पाठविण्यास भाग पाडले.

पैसे भरूनही बक्षिस मिळाले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Person did Fraud of Rupees Seven Lakh and 25 Thousand