अर्थसंकल्पातील भेदभावांबाबत याचिका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - महापालिकेत स्थायी समितीने मांडलेला 2017-18 च्या अर्थसंकल्पात प्रभागस्तरीय विकासकामांसाठी तरतूद करताना पक्षीय भेदभाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यास परवानगी देऊ नये, तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या धर्तीवर आर्थिक तरतूद करून द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून, त्यावर 22 मे रोजी सुनावणी होणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे, ऍड. भैयासाहेब जाधव आणि योगेश ससाणे यांनी कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे. स्थायीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 11 मे रोजी 5912 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावरील चर्चा गुरुवारी सुरू झाली. येत्या शनिवारी (ता. 20) अर्थसंकल्प मंजूर होण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत न्यायालयात पहिल्यांदाच याचिका दाखल झाली आहे. 

न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत म्हटले आहे, की सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना समान अधिकार आहेत. वॉर्डस्तरीय कामांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांची तरतूद झालेली आहे. मात्र प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी तरतूद दाखविण्यात आली आहे. रस्ते, रस्ते दुरुस्ती, चौक सुशोभीकरण, पदपथ तयार करणे, पाणी, सांडपाणी वाहिन्या, स्वच्छतागृह उभारणे आणि देखभाल दुरुस्ती, पथ दिवे आदींसाठी प्रत्येक प्रभागात राजकीय सोयीनुसार तरतूद केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना पाच ते सहा कोटी, तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी दोन ते तीन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, सभागृहनेते व अन्य काही सभासदांच्या प्रभागात 10 कोटी रुपयांची जास्त तरतूद केली आहे. हा भेदभाव असून तो हेतूतः केला आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रभागासाठी समान तरतूद होईपर्यंत अर्थसंकल्प मंजूर करण्यास परवानगी देऊ नये.' 

काळ्या कपड्यांद्वारे निषेध 
अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या प्रभागांसाठी तरतूद करताना झालेल्या भेदभावाबद्दल पठारे, ऍड. जाधव, ऍड. हाजी गफूर पठाण आणि ससाणे यांनी काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश करून निषेध व्यक्त केला. त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही अनेक सदस्यांनी डोक्‍याला काळे रुमाल बांधून आंदोलन केले. 

Web Title: petition for discrimination in Budget